खालापूर (रायगड) - प्रसंगावधान दाखवत स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावर तोल जाऊन पडलेल्या लहान मुलाचा जीव मयूर सखाराम शेळके याने वाचविला आहे. त्याने अतुलनीय शौर्य दाखविले. त्याचा राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी विचार व्हावा यासाठी राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी मयूरच्या नावाची शिफारस करणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.
लहान मुलगा तोल जाऊन रेल्वे रुळावर पडला होता -
सेंट्रल रेल्वे मुंबई डिव्हिजनमध्ये पॉइंट्समन म्हणून काम करणारा मयूर शेळके तळवडे बुद्रुक गावातील रहिवासी आहे. कर्जत तहसील कार्यालयात खासदार बारणे यांनी मयूरचा सत्कार केला. त्याच्या धाडसाचे, धैर्याचे कौतुक केले. यावेळी त्याचे आई-वडील, आमदार महेंद्र थोरवे, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, प्रांताधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार विक्रम देशमुख उपस्थित होते. खासदार बारणे यावेळी म्हणाले, मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरून जाताना लहान मुलगा तोल जाऊन रेल्वे रुळावर पडला. त्यावेळी समोरून ट्रेन येत असल्याचे दिसताच मुलाचा अपघात होणार हे समजल्यावर क्षणाचा विलंब न लावता पॉइंटमन मयूर शेळकेने तत्परतेने धाव घेतली. ट्रेन येण्याआधी काही सेकंद मयूर यांनी मुलाला वाचवले आणि स्वतःदेखील प्लॅटफॉर्मवर चढले.
मयुर शेळकेने स्वतःचा जीव संकटात टाकून लहानग्याचा वाचवला जीव -
आपला जीव धोक्यात घालून मयूरने मुलाचा प्राण वाचविला. त्याच्या धाडसाचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. मयूरचा सर्वांना अभिमान आहे. स्वतः रेल्वे खात्यात नोकरी करत असताना त्याने मुलाचा जीव वाचविला आहे. त्याचे हे कार्य विचार आपल्यासाठी आणि समाजासाठी प्रेरणादायक आहेत, त्याने अतुलनीय शौर्य दाखविले असून, त्याचा राष्ट्रपती शौर्य पुरस्कारासाठी विचार व्हावा यासाठी आपण राष्ट्रपतींना भेटून शौर्य पुरस्कारासाठी मयूरच्या नावाची शिफारस करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.