रायगड - पनवेलमधल्या नावडे फाटा येथे धावत्या कारने पेट घेतला. बघता-बघता काही मिनिटात ही कार जळून खाक झाली. ही घटना बुधवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने महामार्गावरील नागरिकांनी चालकाला वेळीच सावध केल्याने मोठा अनर्थ टळला.
कारमधून तिघेजण तळोजा एमआयडीसीहून पनवेलच्या दिशेने जात होते. नावडे फाटा येथे कार पोहोचली असतानाच अचानक कारमध्ये तांत्रिक बिघाड होवून आग लागली. यावेळी महामार्गावारून जाणाऱ्या नागरिकांनी तात्काळ त्या दिशेने धाव घेतली. प्रसंगावधान राखून त्यांनी कारमधील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सुरुवातीला कारला आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आले नव्हते. पण महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी कारला आग लागल्याचे पाहताच त्यांनी चालकाला कार थांबविण्यास सांगितले. चालकानेही कार तात्काळ थांबविली अन् पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, कार थांबल्यानंतर काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केले. त्यातच ही कार जळून खाक झाली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारला लागलेली आग विझविली. धावत्या कारने पेट घेतल्याची घटना हा परिसरात चर्चेचा विषय झाला.