रायगड - कोरोनाच्या या महामारीत रुग्णालयात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यातच महिला डॉक्टर, आरोग्य सेविका, पॅथॉलॉजिस्ट हे कर्मचारी अहोरात्र आपली सेवा बजावत आहेत. कोरोनाच्या या काळात आपले कर्तव्य बजावत कुटुंबाची काळजीही या महिला अधिकारी-कर्मचारी घेत आहेत. आज (9 मे) जागतिक मातृदिन आहे. याचे औचित्य साधून जिल्हा सामान्य रुग्णालयातील पॅथॉलॉजिस्ट डॉ. शितल दशरथ घुगे जोशी यांच्या कार्याचा इटीव्ही भारतने आढावा घेतला आहे.
कोरोना रिपोर्ट देण्यासाठी झटत आहेत डॉ. जोशी
डॉ. शितल दशरथ घुगे जोशी गेल्या 5 वर्षांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात पॅथॉलॉजिस्ट म्हणून काम करीत आहेत. गेल्या दीड वर्षापासून त्या कोरोना रुग्ण अहवाल तपासणी अधिकारी म्हणून काम करीत आहेत. कोरोना सुरू झाल्यानंतर रुग्णाचे स्वब घेऊन ते पूर्वी कस्तुरबा येथे पाठविले जात होते. त्यानंतर 7 ते 8 दिवसानंतर त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर त्याची नोंद करून ते प्रसिद्ध केले जात होते. त्यावेळी जिकरीचे काम एक महिला अधिकारी म्हणून त्या करीत होत्या. त्यानंतर अलिबाग जिल्हा रुग्णालयात आरटी-पीसीआर लॅब तयार झाली. येथे कोरोना अहवाल त्वरित देण्याकडे डॉ. जोशी यांचा कल राहिला आहे.
घर सांभाळून करतात काम
डॉ. शितल जोशी याचे पती दशरथ घुगे हे न्यूरोलॉजिस्ट सर्जन आहेत. त्यांना सुचित हा 12 वर्षाचा मुलगा आहे. आई-वडिल डॉक्टर असल्याने सुचित एकटाच घरी असतो. डॉ. जोशी आपल्या मुलाकडे आणि कुटुंबाकडे लक्ष देऊन रुग्णालयातील महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. डॉ. जोशी यांना काम करताना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी कोरोनावर मात केली. सध्या त्या आपली सेवा उत्तमपणे बजावत आहेत.
सुचित करतो आईला कामात मदत
कोरोना महामारीत काम करताना स्वतः ची आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेऊन डॉ. जोशी तारेवरची कसरत करीत आहेत. अशाच परिस्थितीत त्यांचा मुलगा सुचितही त्यांना कामात मदत करीत असतो. आई-वडिल घरी येण्याआधी त्यांच्यासाठी गरम पाणी काढून ठेवणे, घरात आल्यावर सॅनिटायझर देणे, घरातील कचरा काढणे, भांडी धुणे यासारख्या कामात तो आईला मदत करीत असतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने आई आणि मुलांमधील नाते हे कोरोना काळात घट्ट झाले आहे.
हेही वाचा - कृषि सहाय्यकांना विमा संरक्षण द्या; खासदार श्रीनिवास पाटील यांची मागणी
हेही वाचा - खट्याळ मुलापेक्षा जास्त फडणवीसांचा थयथयाट - महापौर पेडणेकर