पनवेल - मोरबे धरणाच्या भिंतीला ठिकठिकाणी तडे गेल्यामुळे धरणातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. धरणाची डागडुजी करण्याकडे पाटबंधारे खाते दुर्लक्ष करत, असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या ठिकाणी धरणाला तडे गेल्यामुळे पाण्याच्या अपव्ययाबरोबरच शेतकऱ्यांच्या भातशेतीचेही नुकसान होत आहे.
धरण आणि भातशेतीची ही परिस्थिती पाहुन आमदार प्रशांत ठाकूर यांनी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला. पनवेल तालुक्यातील खैरवाडी- गारमाळ परिसरात वसलेले हे मोरबे धरण जवळपास ५० एकर जमिनीवर आहे. या धरणाचे पाणी आजूबाजूच्या गावातील शेतीसाठी तसेच मोरबे, दुंदरेपाडा, चिंचवली या गावांना पिण्यासाठी वापरले जाते. ३.२२ दशलक्ष घनमीटर या धरणाची क्षमता असून ३.१२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा यामध्ये असतो.
यंदा दुष्काळामुळे तालुक्यातील अनेक गावे पाणीटंचाईने त्रस्त आहेत. सद्यस्थितीत पनवेलमधील ३६ गावे -वाड्यामध्ये पाणीटंचाईसदृश परिस्थिती आहे. येथील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे, अशी परस्थिती असताना मोरबे धरणातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. कित्येक महिन्यांपासून धरणाच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभाग लक्ष देत नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
त्यामुळे पनवेल तालुक्यातील मोरबे धरणाच्या दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे केली. त्या अनुषंगाने धरणाच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम क्षेत्रीय स्तरावर प्रगतिपथावर असून लवकरच या धरणाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात होणार आहे.