रायगड - मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी व्यथा मांडली आहे. महामार्गावर माणगावजवळ सुरू असलेल्या रुंदीकरण कामाबाबत आणि पडलेल्या खड्यांबाबत त्यांनी एक व्हिडीओ तयार केला आहे. गेली अनेक वर्षे या महामार्गाचे काम सुरू आहे. गणेशोत्सवाच्या काळात खड्डेमय रस्त्याने चाकरमानी गेले. आतातरी सरकारने या महामार्गाकडे लक्ष देऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी विनंती नितीन सरदेसाई यांनी व्हिडीओद्वारे शासनाकडे केली.
मनसे नेते नितीन सरदेसाई हे 12 सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथून मुंबईकडे निघाले होते. मुंबई-गोवा महामार्गाची झालेली खड्डेमय परिस्थिती पाहून माणगावनजीक सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी थांबून त्यांनी एक व्हिडीओ तयार केला. रत्नागिरीपासून ते माणगावपर्यंतचा महामार्ग हा खड्डेमय झाला आहे. प्रवास करताना खड्ड्यांमुळे दोन अपघात झालेले पाहिले. रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. महामार्गावर सुरू असलेल्या कामाठिकाणी कोणीही नसल्याचेही सरदेसाई यांनी व्हिडीओद्वारे दाखविले.
गणेशोत्सवापूर्वी या महामार्गचे काम पूर्ण करणार होते. मात्र चाकरमान्यांना खड्डेमय रस्त्यानेच जावे लागले. गेली अनेक वर्षे या रस्त्याचे काम रडतखडत सुरू आहे. आतातरी सरकारने हा महामार्ग सुस्थितीत करावा, अशी विनंती सरदेसाई यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फार्महाऊसची रेकी करणारे तिघे रायगड पोलिसांच्या ताब्यात
हेही वाचा - रायगडमधील अलिबाग समुद्रकिनारी पर्यटकांची वर्दळ