रायगड - अलिबाग समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या कार्यालयाच्या जागेमध्ये गेली 62 वर्षे एक मुस्लीम कुटुंब राहत आहे. या मुस्लीम कुटुंबाला जमीन सोडण्यासाठी एमएमबी कार्यालयाने नोटीस दिली होती. पावसाळा संपल्यावर नजीकच्या जागेमध्ये स्थलांतरीत करण्याचे मुस्लीम कुटुंबाने मान्य केल्यावरही एमएमबीने जुलमाने गुरुवारी त्यांच्या घरावर हातोडा मारला. या घटनेचे वृत्त अलिबाग शहरामध्ये पसरताच एमएमबीच्या कार्यालय परिसरामध्ये मुस्लीम समाजासह हिंदू समाजातील नागरिकांनी गर्दी केली. एमएमबीच्या अरेरावीबाबत नागरिक प्रचंड संतापले होते. उच्च न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आल्याने तुर्तास कारवाई स्थगित करावी, अशा मागणीचे निवदेन द्या असे एमएमबी अधिकारी टोपणो यांनी सांगितले. यानंतर प्रकरण शांत झाले.
अलिबाग समुद्र किनारी एमएमबीचे कार्यालय आहे. त्याच परिसरामध्ये मोहमंद युसूफ ईब्राहीम हाफसाणकर हे त्यांच्या कुटुंबासह 1957 सालापासून या ठिकाणी राहत आहेत. याच घरामध्ये हाफसाणकर यांचा मुलगा मुफीद आणि त्यांच्या भावंडाचा जन्म झाला. तेव्हापासून या जागेबाबत एमएमबीसोबत वाद सुरू आहे. यातून मार्ग काढण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी राजीव सिन्हा यांनी हाफसाणकर यांच्या झोपडीवजा घरा एवढी जागा सर्वे नंबर 43/ अ मध्ये दिली आहे. काही कारणामुळे त्या जागेत हे कुटुंब स्थलांतरीत झाले नाही. त्यानंतर हाफासाणकर यांचे निधन झाले. त्यानंतर आहे त्याच जागेत हे कुटुंब वास्तव्य करत आहेत.
हा वाद न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने हाफसाणकर यांचा दावा फेटाळून लावला. त्यामुळे एमएमबीने सदरची जागा खाली करून द्यावी अशी नोटीस हाफसाणकर यांच्या कुटुंबाला दिली. मात्र, पावसाळ्यात आता आम्ही कसे बाहेर जाणार, पावसाळा संपल्यावर नेमून दिलेल्या जागेत स्थलांतरीत होणार असल्याचे हाफासाणकर यांचा मुलगा मुफीद याने मान्य केले होते. मात्र, तरीही एमएमबीने आज कारवाई करण्यास सुरुवात केली. यासाठी मुरुड येथील एमएमबी कर्मचाऱ्याना बोलवण्यात आले होते.
हाफसाणकर कुटुंबाने या कारवाईला कडाडून विरोध केला. त्यावेळी मुस्लीम, हिंदू समाजातील नागरिकांनी ही कारवाई थांबवण्याबाबत अजित टोपणो याना विनंती केली. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. हाफसाणकर परिवाराला जागा खाली करण्याची नोटीस आधीच दिलेली आहे. वरिष्ठ स्तरावरून कारवाई करण्याबाबत स्पष्ट निर्देश आहेत. त्यामुळे कारवाई करण्यात येत असल्याचे टोपणो यांनी स्पष्ट केले. त्यावर हाफसणकर यांची बाजू मांडणारे अॅड. जुनेद घट्टे यांनी हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल झाले आहे. त्यामुळे असा एकतर्फी निर्णय घेता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या केसचा नंबर देखिल अॅड. घट्टे यांनी दाखवला. उच्च न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आल्याने तुर्तास कारवाई स्थगित करावी अशी मागणीचे निवदेन द्या असे टोपणो यांनी सांगितले. त्यानंतर प्रकरण शांत झाले.
भर पावसाच्या हंगामामध्ये एका कुटूंबाला बेघर करण्याच्या घटनेमुळे नागरिक प्रचंड संतापले. त्यांनी एमएमबीच्या कृत्याला कडाडून विरोध केला. मात्र, एमएमबी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. एमएमबीच्या जुलमी अन्यायामुळे माझे जीवन संपवून टाकतो असे मुफीद हाफसाणकर याने सांगताच पोलीस यंत्रणाही चांगलीच सर्तक झाली. हा प्रकार प्रादेशिक बंदर अधिकारी अजित टोपणो यांच्या कार्यालयाच्या परिसरातच घडत होता. मात्र, त्यांनी सुरुवातीला ढुंकूनही पाहीले नाही. त्यामुळे नागरिक कमालीचे संतापले. नागरिकांचा पारा चढत असल्याने पालिस निरीक्षक के.डी.कोल्हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंर प्रादेशिक बंदर अधिकारी टोपणो त्यांच्या दालानात हजर झाले.
याप्रसंगी समाजवादी पार्टीचे अशरफ घट्टे, इफत्तेखार अखतार, मुश्ताक घट्टे, केदार तरे, नसिम बुक बाईंडर, बड्या जुईकर, जफर सय्यद, अनिल जाधव विजय मोरे आदी उपस्थित होते.
पावसाळ्यात एखाद्याला बेघर करणे हे नैसर्गिक न्यायाच्या कक्षेत बसत नाही. हाफसाणकर कुटुब पावसाळा संपल्यावर स्थलांतरीत होतील. त्यासाठी शपथपत्र देखिल देण्यास तयार आहेत. जिल्हाधीकाऱ्याना दिलेल्या निवदेनात तेच नमुदही केले असल्याकडे स्थानिक नागरिक अल्ताफ घट्टे यांनी लक्ष वेधले.
बंदर विभागाचे मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात कारवाई थांबवण्याचे पत्र द्या, आम्ही कारवाई करणार नाही असे सांगितले असताना देखील एमएमबीच्या कार्यालायतील परिसराचे गेट बंद करुन घर पाडायला सुरुवात केली. घरात लहान मुले आहेत, मुकबधीर बहिण आहे. पावसात घराबाहेर काढल्यावर राहणार कोठे असा सवाल मुफीद हाफसाणकर यांनी सांगितले.
एमएमबीच्या हद्दीमध्येच नगर पालिकेने स्वच्छता गृह बांधली आहेत. ते पाडण्याचे आदेश पर्यावरण विभागाने दिलेले असतानाही एमएमबीने ते बांधकाम पाडलेले नाही. मात्र, हाफसाणकर कुटुबाला बेघर करण्यासाठी लगेचच का कारवाई केली जाते असाही प्रश्न आहे.