रायगड - 'मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणाना किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपले अधिकार माहीत नाहीत का? महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षाचे सरकार असून ते कधीही पडण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारला सरकार वाचविण्याचे स्वारस्य आहे. मराठा आरक्षण वा इतर महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्याबाबत त्यांना स्वारस्य नाही. महाविकास आघाडीतील सरकार एकमेकाला खुश करण्याचे काम करीत आहेत'. असा सणसणीत आरोप शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.
अलिबाग येथे जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांच्यासमोर तांबडी प्रकरणाबाबत भूमिका मांडण्यासाठी आमदार विनायक मेटे आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संपर्क साधून प्रतिक्रिया दिली. अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जास्त अधिकार दिले. याबाबत विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारचा समाचार घेतला. मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार नऊ महिन्यांपासून मराठा समाजाची दिशाभूल करीत असल्याचा, आरोप आमदार विनायक मेटे यांनी केला आहे.
रोहा तांबडी प्रकरणात आरोपीना फासावर लटकवा
रोहा तालुक्यातील तांबडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली. याबाबत काल(बुधवार) आमदार विनायक मेटे यांनी पीडित मुलीच्या घरी जाऊन कुटूंबाचे सांत्वन केले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांची भेट घेतली. या प्रकरणाचा तपास लवकर करून दोषींना फासावर लटकवा. या प्रकरणी प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. उज्वल निकम यांची नियुक्त करा, अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली आहे.