रायगड - शासकीय सेवेत असलेल्या डॉक्टरांना राज्य शासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर विमा संरक्षण दिले आहे. त्याच पद्धतीने खासगी डॉक्टरांनाही राज्य शासनाने विमा कवच द्यावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आणि विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील यांनी शासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
रायगड जिल्ह्यात कोविड-19 बाधित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजारी पडलेले नागरिक हे खासगी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करत आहेत. त्यामुळे अलोपॅथी, आयुर्वेदीक डॉक्टरांना कोविडची लागण होण्याची शक्यता आहे. तसेच काही डॉक्टरांना याची बाधा झाल्याच्याही घटना जिल्ह्यात घडत आहेत. शासकीय सेवेत असलेले डॉक्टर यांना शासनाने विमा संरक्षण सरकारने दिले आहे. मात्र, असे संरक्षण खासगी डॉक्टरांना दिलेले नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू
शासनाने खासगी डॉक्टरांचा विमा उतरवला तर ते सुद्धा कोविड-19 च्या बाधित रुग्णावर उपचार सुरू करू शकतील. ग्रामीण भागात नागरिक आजारी पडला, तर तो खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी जात असतो. मात्र, अशावेळी त्या डॉक्टरांनाही कोविड-19 ची बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे या डॉक्टरांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. जर शासनाने या डॉक्टरांनाही विमा कवच दिल्यास शासकीय डॉक्टरांवर पडणारा ताण देखील कमी होऊ शकतो, याबाबत आपण राज्य शासनाला निवेदन दिले आहे. त्याचा पाठपुरावा करणार असल्याचेही आमदार जयंत पाटील यांनी सांगितले आहे.