रायगड - विधानसभा निवडणुकीची तारीख अजून जाहीर झालेली नसली तरी संभाव्य उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. राजकीय पक्षांनीही अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांनी अनंत चतुर्थीच्या मुहूर्तावर किल्ले रायगडावर जाऊन प्रचाराचा शुभारंभ केला. जगदीश्वर मंदीर, शिव समाधी, राजसदरेसमोर जाऊन गोगावले हे नतमस्तक झाले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दोन चार दिवसात लागू होण्याची शक्यता आहे. त्याआधीच अनेक संभाव्य उमेदवार जनतेशी गाठीभेटी घेण्यास मश्गुल झाले आहेत. तसेच महाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांनाच पुन्हा शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराचा शुभारंभ किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन केला आहे. पुढील आठवड्यापासून पितृपक्ष पंधरवडा सुरू होणार असल्याने त्यांनी अनंत चतुर्दशीच्या मुहुर्तावर प्रचाराचा नारळ फोडला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गोगावले यांनी पुन्हा महाड पोलादपूर विधानसभेवर भगवा फडकणार असा ठाम विश्वास बोलून दाखविला.
महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून गोगावले हे 2009 व 2014 असे दोन वेळा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप यांचा पराभव करून विजयी झाले आहेत. यावेळीही भरत गोगावले विरुद्ध माणिक जगताप असाच सामना रंगणार आहे. मात्र, यावेळी ही लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे. तर भरत गोगावले यांनी आपलाच विजय होणार असल्याची खात्री वर्तवलेली आहे.