रायगड - पर्यटकांना समुद्रकिनारी आल्यानंतर मौजमजा करता यावी, यासाठी जलक्रीडा, घोडागाडी, घोडा, उंट सवारी त्याचबरोबर एटीवी बाईकची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, एटीवी बाईकला समुद्रावर फिरविण्याची परवानगी नसताना अनेक बाईकस्वार सर्रासपणे समुद्रावर बाईक सवारी करतात. बाईकस्वारांच्या या मुजोरीपणामुळे अनेकदा अपघात होत असतानाही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. अशा मुजोर बाईक स्वारांवर कारवाई होणे तितकेच महत्त्वाचे आहे.
एटीवी बाईक स्वार पर्यटकांच्या जीवाशी खेळतात -
कोरोनानंतर आता अलिबागच्या समुद्रकिनारी हजारो पर्यटक येऊ लागले आहेत. समुद्रावर आल्यानंतर पर्यटक किनाऱ्यावर असलेल्या घोडागाडी, घोडा, उंट सफारी, जलक्रीडा तसेच एटीव्ही सवारीचा आनंद लुटतात. एटीव्ही चालक हे धूम स्टाईलने बाईक चालवून पर्यटकांना मजा देत आहेत. मात्र, समुद्र किनारी गर्दी असल्याने अनेकदा अपघात ही होत असतात. अशावेळी काही मुजोर बाईक चालक हे पर्यटकाशी हुज्जत घालत असतात.
अपघात झाल्यानंतरही बाईक चालकाची मुजोरी -
काल सायंकाळी अलिबागच्या समुद्रकिनारी येणाऱ्या रस्त्यावर एटीवी बाईक स्वाराने दोन महिलांना धडक दिली. या धडकेत महिलेला गंभीर दुखापत झाली. त्यावेळी एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने या घटनेचे फोटो काढून वृत्तांकन केले. त्यावेळी बाईक चालकाने त्याचा मोबाईल हिसकावून घेऊन त्यातील फोटो डिलीट केले. याबाबतही अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
प्रशासनाने वेळीच उपाय करणे गरजेचे -
समुद्रावर एटीवी बाईक चालविण्यास प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. तरीही बाईक स्वार नियमांचे पालन न करता भरधावपणे बाईक चालवतात. त्यामुळे पर्यटक असो किंवा स्थानिक नागरिक यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ लागला आहे. यावर प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
हेही वाचा - मुंबई-पुणे महामार्गावर ट्रक चालकाला रिव्हॉल्वर दाखविणारे 24 तासात जेरबंद