रायगड- जिल्ह्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यादरम्यान, 4 ते 6 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जिल्ह्यात पूरसदृश्य भागात नागरिकांनी बाहेर पडू नये, पुराच्या पाण्यातून वाहने काढू नये. तसेच, नदी किनारी व समुद्र किनारी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
दरडग्रस्त, सखल भागातील नागरिकांनी योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी जाऊन स्थलांतर करावे. आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. इलेक्ट्रिक खांब, स्विच बोर्ड, इलेक्ट्रिक तारांना हात लावू नये, यापासून दूर राहावे. स्थानिक प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करावे, त्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. असे आवाहनही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
जिल्ह्यात 3 जुलैच्या रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सावित्री, कुंडलिका या नद्यांनी आपली धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महाड, नागोठणे, रोहा, पाली भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी या ठिकाणच्या बाजारपेठा, रस्ते, छोटे पूल हे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. म्हणून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले.
त्याचबरोबर, एकीकडे कोरोना संकट तर दुसरीकडे पाऊस पडून पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना आजार होण्याची शक्यता देखील बळावली आहे. वाहणाऱ्या पाण्यामध्ये पाय भिजविल्याने लेपरोपायरसी आजाराची भीती असते. हा आजार होऊ नये यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने डोक्सी सायक्रिन औषध घेण्याबाबतही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
हेही वाचा- पुराच्या पाण्यात अडकलेल्या 25 जणांना सुखरुपस्थळी हलविले