रायगड - कर्जत नगरपरिषदेत सहा वर्षे मुख्यधिकारीपदी काम केलेले सेवानिवृत्त अधिकारी डी एन अटकोरे यांनी आपल्या मुलीचा विवाह सोहळा अवघ्या अकरा जणांच्या उपस्थितीत साजरा केला. कोरोना महामारीच्या काळात समाजापुढे एक आदर्श ठेवला.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने निर्बंध लावले आहेत. त्या निर्बंधाना अधीन राहून कर्जत नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी म्हणून काम केलेले सेवानिवृत्त अधिकारी डी एन अटकोरे यांना आपली कन्या डॉ. ऋतुजा हीचा विवाह थाटामाटात करण्याचा विचार होता. कारण त्यांच्या कुटूंबातील हे पहिलेच लग्न होते, मात्र गेल्या वर्ष - सव्वा वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट आहे याची पुरेपूर जाणीव ठेवून शासकीय नियमांचे पालन करूनच लग्न सोहळा करायचे ठरविले. त्यांना सालवे कुटुंबियांनी पूर्ण सहकार्य करण्याचे ठरविले. कर्जतमध्ये अटकोरेंनी आपल्या सेवा काळात अनेक मित्र मिळविले होते. त्यांना तर बोलवावे लागेल काय करावे ? हे त्यांना सुचत नव्हते. अखेर कुणालाच निमंत्रित करायचे नाही असे ठरवले.
बौद्ध व हिंदू धर्माने पार पडला विवाह सोहळा...
लग्नाचा दिवस उजाडला, कर्जत येथील राज कॉटेज मध्ये एका छोट्या सभागृहात लग्न सोहळा सुरू झाला. विवाह सोहळ्यासाठी 25 जणांच्या उपस्थितील परवानगी होती, तरीही यावेळी वधू - वर यांच्यासह दोन्ही कुटुंबातील मिळून केवळ अकरा माणसे उपस्थित होती. दोन फोटोग्राफर, दोन बौद्धचार्य, एक ब्राम्हण, दोन जेवण वाढणारे असे एकूण 11 जण उपस्थित होते. विवाह बौद्ध धर्म व हिंदू धर्म आशा दोन पद्धतीने पार पडला. हिंदू धर्म पद्धतीने विवाह करताना वधू - वरांच्या मागे मामा उभे असतात. त्यांची कमतरता मंडप तयार करणाऱ्या दोघांना बोलवून ती उणीव भरुन काढली व विवाह सोहळा केवळ अकरा जणांमध्ये आदर्शवत सोहळा साजरा झाला. डी.एन.अटकोरे यांनी या निमित्ताने मोठा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.