रायगड - महाडमधील तारिक गार्डन इमारत दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी फारूक काझी याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आठवडा भरापूर्वी फारूक माणगाव सत्र न्यायालयाला शरण आल्यानंतर त्याला महाड शहर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर महाड प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज ही मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. आज फारुकच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यामुळे पोलिसांनी केलेली पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.
24 ऑगस्ट रोजी इमारत दुर्घटना घडली होती. यामध्ये 40हून अधिक संसार उध्वस्त झाले तर 16 जणांना आपला जीव गमवावा लागला. तेंव्हापासून फारूक फरार होता. या प्रकरणात 6 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मुख्य आरोपी आणि बांधकाम व्यावसायिक फारूक काझी 3 सप्टेंबर रोजी माणगाव सत्र न्यायालयासमोर हजर झाला. तेव्हा न्यायालयाने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या गुन्ह्यात आतापर्यंत फारुकसह आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमाणे व फारुकचा सहकारी युनूस शेख या तिघांना अटक झाली आहे.