पेण (रायगड)- पीओपीवरील बंदी विरोधात राज्यातील गणेश मूर्तिकार आक्रमक झाले आहेत. पेणमधील मूर्तिकारांच्या शिष्टमंडळाने दिल्लीमध्ये धडक देऊन केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. गणेश मूर्तिकारांनी लेखी निवेदनाद्वारे पीओपीवरील बंदी उठविण्याची मागणी केली आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांची पुढील वर्षी गणेशोत्सवापासून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे पुढील गणेशोत्सवापासून प्लास्टर ऑफ पॅरिस हद्दपार करण्याचा निर्णय पर्यावरण खात्याने घेतला आहे. त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती हद्दपार होणार आहेत. यासाठी गणेश मूर्ती कारखानदार पीओपीवरील बंदी उठवण्यासाठी दिल्लीत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव व केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव व मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील या बंदीबाबत सरकार सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन यावेळी गणेशमूर्ती कारखानदारांना दिले.
हेही वाचा-ST PROTEST : दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
लाखो लोकांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती-
रायगड जिल्ह्यातील 10 हजार व महाराष्ट्रातील 20 लाख लोक हे गणपती उद्योगावर अवलंबून आहेत. जर प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीवर बंदी आणली तर रायगड जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. प्रत्यक्षात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तीमुळे पर्यावरणावर कोणताही परिणाम होत नसल्याचा निष्कर्ष समितीने नेमलेल्या शास्त्रज्ञांनी काढला आहे. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीवर बंदी आणू नये, असे गणेश मूर्ती कारखानदारांनी भुपेंद्र यादव यांच्याकडे दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे.
गणेश मूर्तीकारांचा काय आहे दावा?
- गणेश मूर्तींना देण्यात येणाऱ्या रंगामुळे प्रदूषण होते, असे पर्यावरण खात्याचे म्हणणे आहे. तसे असेल तर पर्यावरण खात्याच्या शिफारशीप्रमाणे रंग वापरण्यास मूर्ती कारखानदार तयार आहेत.
- पीओपीला पर्याय म्हणून पर्यावरण खात्याने शाडू मातीची मूर्ती बनवण्यास सांगत आहेत. परंतु मातीची मूर्ती बनविताना 10 ते 15 टक्के गणेशमूर्तीमध्ये तूट होत असते.
- जर मखरात बसविलेल्या मूर्तीला तडा गेला तर गणेश भाविकांच्या भावना दुखावल्या जातात. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात वाहतुकीसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती सुरक्षित आहेत. अशा मूर्तींना मोठ्या प्रमाणावर मागणी असते.
- पेण तालुक्यात घरोघरी गणपतीच्या मूर्ती बनविल्या जातात. शाडूच्या मातीच्या मूर्ती तयार करण्यास अधिक कालावधी लागतो. त्यासाठी जागादेखील अधिक लागते.
प्लास्टर ऑफ पॅरीसवरील बंदीचा फेरविचार करण्याची मागणी गणेशमूर्ती कारखानदार यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे केली.
हेही वाचा-तर मंत्र्यांची दिवाळी साजरी होऊ देणार नाही - पूजा मोरे
पर्यावरण मंत्र्यांच्या भेटीत हे होते उपस्थित
उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ रवींद्र पाटील, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रविकांत म्हात्रे, हमरापूर विभाग गणेश मूर्तिकार अध्यक्ष गोपीनाथ मोकल, सचिव प्रवीण बावधनकर, राजन पाटील, खजिनदार रोशन नाईक, सदस्य जयेश पाटील, बल्लाळ पाटील, कैलास पाटील, सचिन पाटील, भगवान पाटील, कुणाल पाटील, रवी मोकल, संतोष मोकल, रुपेश पाटील, अरविंद पाटील, अमोल कुंभार आदी कारखानदार उपस्थित होते.