रायगड - जिल्ह्यातील एक प्रमुख मतदारसंघ म्हणून कर्जत मतदारसंघाचा उल्लेख केला जातो. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार सुरेश लाड हे तिसऱ्यांदा आमदारकीसाठी निवडणूक लढवत आहे, तर त्यांच्या विरोधात महायुतीकडून महेंद्र थोरवे हे रिंगणात आहेत. यामुळे येथे आघाडी विरूद्ध महायुती अशी सरळ लढत होताना दिसत आहे.
कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ हा मुंबई व पुणे शहराला लागून आहे. आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश लाड व महायुतीकडून शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांच्यात खरी लढत आहे. आमदार लाड हा गड राखणार की महेंद्र थोरवे भगवा फडकवणार हे काही दिवसात समजणार आहे.
हेही वाचा... शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही, आदित्य ठाकरेंचा भाजपला घरचा आहेर
कर्जत मतदारसंघात 2 लाख 57 हजार 331 मतदार असून 389 मतदान केंद्र आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षाची ताकद आहे. खोपोली नगरपालिका, खालापूर नगरपंचायत राष्ट्रवादीकडे आहेत. तर माथेरान व कर्जत नगरपालिका शिवसेनेकडे आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या आठ जागा असून शेकाप, काँग्रेस, शिवसेना यांच्याकडे प्रत्येकी एक सदस्य तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाच सदस्य आहेत.
कर्जत विधानसभा मतदारसंघात सलग दोन वेळा आमदार निवडून येण्याची परंपरा असून तिसऱ्या वेळी येथील मतदार हे बदल घडवत असल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. विद्यमान आमदार सुरेश लाड हे सलग दोनदा निवडून आलेले आहेत. तर याआधी शिवसेनेचे देवेंद्र साटम हे सलग दोनदा निवडून आलेले होते.
हेही वाचा... 'भाजप सरकारला धडा शिकवण्याची गरज आहे'
2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड हे 57 हजार मतांनी निवडून आले होते. शेकापकडून महेंद्र थोरवे यांना 55 हजार 113 मते पडली होती. तर शिवसेना उमेदवार हनुमंत पिंगळे हे 40 हजार 721 मते घेऊन तिसऱ्या नंबरवर राहिले होते. थोरवे यांचा अवघ्या 1900 मताने पराभव झाला होता. 2014 च्या निवडणुकीत सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते. यावेळी सुरेश लाड यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. मात्र नंतर पक्ष आणि कार्यकर्ते यांच्या आग्रहाने त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेस व शेकापची साथ आहे. शिवसेना, भाजप, याची महायुती असून भाजपची ताकदही कर्जतमध्ये वाढलेली आहे. शिवसेनेचे सुरेश टोकरे, हनुमंत पिंगळे यांनी ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश लाड यांची ताकद वाढलेली असली तरी शिवसेनेसोबत भाजप असल्याने महेंद्र थोरवे यांनीही यावेळी कंबर कसली आहे.
हेही वाचा... मनसेचा उमेदवार 'चंपा'ची चंपी करणार - राज ठाकरे
कर्जत विधानसभा मतदारसंघात रसायनी, खालापूर, खोपोली हा भाग औद्योगिक क्षेत्र आहे. मात्र असे असतानाही अनेक कंपन्या बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे येथील बेरोजगार तरुणांना नोकरीसाठी मुंबई पुणेकडे जावे लागत आहे. रस्त्याचा प्रश्नही बिकट आहे. कर्जत खालापूर मध्ये आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचे अनेक मूलभूत प्रश्न अधोरेखित राहिलेले आहेत. त्यामुळे सलग तीन वेळा निवडून येण्याचा मान सुरेश लाड यांना मिळणार की महेंद्र थोरवे ही परंपरा कायम राखणार हे मतदारांच्या हातात आहे.