रायगड - महाडचे शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांचा रायगड किल्ल्यावर प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीजवळ शिवसैनिकांनी राजकीय घोषणाबाजी केली होती. त्यामुळे खासदार संभाजीराजे आणि शिवभक्तांनी यावर आक्षेप घेतला होता. समाजमाध्यमावर सुद्धा गोगावले ट्रोल झाले होते. आमदार भरत गोगावले यांनी बुधवारी या प्रकाराबाबत माफीनामा जाहीर केला.
12 सप्टेंबरला अनंत चतुर्थी दिवशी महाडचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांनी रायगड किल्ल्यावर जाऊन विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. भरत गोगावले यांनी जगदीश्वर मंदिर, शिव समाधी व राजसदरेवर जाऊन आशीर्वाद घेतले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळावर चढून भरत गोगावले समर्थक यांनी राजकीय घोषणाबाजी केली. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर फिरत आहे. समाधीस्थळावर जाऊन घोषणाबाजी केल्याने गोगावले यांच्यावर टीका होऊ लागली. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ही या प्रकाराबाबत आक्षेप घेतला असून समाधी स्थळावर राजकीय घोषणाबाजी करणे योग्य नाही. समाधी व रायगड किल्ल्याचे पावित्र्य राखणे हे सर्वच राजकीय पक्षाचे काम आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अथवा पदाधिकाऱ्यांचा हेतू नव्हता. शिवभक्त म्हणून नेहमी रायगडावर जाऊन नतमस्तक होत असतो. उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांकडून अजाणतेपणाने राजकीय घोषणा दिल्या गेल्या. झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असा माफीनामा आमदार भरत गोगावले यांनी दिला आहे.