नवी मुंबई - मेड इन इंडिया आयकॉन 2021 या नामांकित पुरस्काराचे वितरण सोहळा भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य अभिजित पाटील यांना मुंबईतील राजभवन येथे प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विशेष व्यक्तींना हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. यंदाचा पुरस्कार अभिजित पाटील यांना मिळाल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे 20 जूनला संध्याकाळी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विशेष व्यक्तींना मेड इन इंडिया आयकॉन हा पुरस्कार दिला जातो. यावेळी पनवेलचे भूमिपुत्र अभिजित पाटील यांना सामाजिक आणि पर्यावरणासाठीच्या केलेल्या कामाची दखल घेत त्यांना मेड इन इंडिया आयकॉन 2021 महाराष्ट्र सन्मान प्रदान करण्यात आला. अभिजित पाटील हे पनवेलचे सुपूत्र असून, पनवेलच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. अभिजीत पाटील यांच्यासह गायक उदित नारायण, कुमार सानू , मराठी कलाकार स्वप्निल जोशी, भरत जाधव, प्रशांत दामले, यांनाही सन्मानित करण्यात आले.
कोण आहेत अभिजित पाटील?
गेली अनेक वर्षे राजकीय क्षेत्रातील अभ्यास, त्यानंतर उद्योग क्षेत्रात अभिजित पाटील यांनी मारलेली उत्तुंग भरारी. हे सगळं करीत असताना नुकत्याच दीड महिन्यापूर्वी केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर सदस्यपदी नेमणूक करण्यात आल्यामुळे अभिजित पाटील यांच्या अभ्यासू नेतृत्वाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. हे सगळे होत असताना त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या अडचणी संदर्भात पत्रव्यवहार करून पाठपुरावा देखील सुरू केला आणि आता त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते राजभवन येथे मेड इन इंडिया आयकॉन 2021 हा नामांकित पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
'इथेच थांबणार नाही यशाचे शिखर गाठायचे आहे'
मला भरभरून यशाची नेहमी भीती वाटायची. त्याने माणसं तुटतात, आपण एकटे पडतो असे वाटायचे. आपल्याला नकोच ते यशबिश! पण पुरस्कार मिळाल्यापासून माझ्यावर मनापासून केलेल्या प्रेमाचा वर्षांव बघत आहे. भीती कमी होते आहे. यापुढे इथेच थांबणार नाही यशाचे शिखर गाठायचे आहे, असेही अभिजित पाटील यांनी सांगितले आहे.