रायगड - सुमारे आठ वर्ष वयाचा नर जातीचा बिबट्या महाड तालुक्यातील टोळ गावाच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे मृतावस्थेत सापडला. स्थानिकाने दिलेल्या माहितीनंतर वनविभागाने या मृत बिबट्याला ताब्यात घेतले. पंचनामा, शवविच्छेदन केल्यानंतर शासकीय नियमानुसार या बिबट्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. हा बिबट्या तीन ते चार दिवसांपूर्वी फासकीमध्ये (सापळा) अडकला होता.
महाड तालुक्यातील टोळ गावाच्या हद्दीत असलेल्या जंगलात शिकार करण्यासाठी अज्ञात व्यक्तीने फासकीचा ट्रॅप लावला होता. या लावलेल्या फासकीच्या ट्रपमध्ये एक बिबट्या अडकला. त्याने सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रॅपमधून निसटू न शकल्याने त्याचा मृत्यू झाला.
टोळ गावातील एक व्यक्ती चार दिवसांनी जंगलात गेला असता, हा प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याने वन विभागाला याविषयी कळविले. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सडलेल्या बिबट्याला फासकीतून मोकळे केले. पंचनामा झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली गेली.
जंगलात शिकार करण्यास बंदी असतानाही अजूनही काहीजण प्राण्यांची शिकार करीत आहेत. त्यामुळे दुसऱ्या प्राण्यांसाठी लावलेल्या फासकीत बिबट्याचा हकनाक जीव गेला आहे. जंगलात जंगली प्राण्यांची अवैधपणे शिकार सुरू असून वन विभाग मात्र याकडे कानाडोळा करताना दिसत आहे.