रायगड - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोर्लई येथील जमीनबाबत चौकशी करण्यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या 10 फेब्रुवारी रोजी लाक्षणिक धरणे आंदोलन करणार आहेत. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोर्लई येथील जमिनीबाबत निवडणूक अयोगाकडेही तक्रार केली आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या या धरणे आंदोलनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जमीन चौकशी बाबत प्रशासन काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
कोर्लई गावात रश्मी ठाकरे यांच्या नावे आहे जमीन-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व मनीषा वायकर यांच्या नावे 9 एकर जमीन अन्वय नाईक कुटुंबाकडून खरेदी केली आहे. या जमिनीचा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात केला नसल्याचा आणि जागेवर असलेल्या घराचा उल्लेख केला नसल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी सोमय्या यांनी कोर्लई ग्रामपंचायतमध्ये जाऊन याबाबत माहिती अधिकारात माहिती घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जमिनीबाबत माहिती लपवली असल्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली आहे.
उद्धव ठाकरे यांची चौकशी व्हावी-
कोर्लई येथील जागेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चौकशी व्हावी यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आंदोलनाचा पावित्रा उचलला आहे. उद्या 10 फेब्रुवारी रोजी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता लाक्षणिक धरणे आंदोलन करणार आहेत. जिल्हा प्रशासन यामध्ये काय भूमिका घेणार त्यानुसार पुढील पावले उचलणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
हेही वाचा- रखडलेल्या बीडीडी पुनर्विकासातील 272 घरांची लॉटरी आता 11 फेब्रुवारीला