रायगड - रायगड जिल्हा तिसऱ्या टप्प्यात आल्याने प्रशासनाकडून निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तर यामुळे वर्षा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात कर्जत तालुक्याला पर्यटकांकडून पसंती दिली जात आहे. अशात विकेंडला तालुक्यात पर्यटकांची गर्दी असताना पाली-भूतीवली धरणात तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तिन्ही शाळकरी मुले असून ते मुंबई येथील रहिवासी आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असताना पर्यटक मजा करण्यासाठी पोलिसांची नजर चुकवून जात असल्याने अपघात घडत असल्याचे चित्र आहे.
बुडालेली तिन्ही मुले अल्पवयीन -
कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक हे वर्षा पर्यटनासाठी पसंती देत असतात. अशात मागील वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने तालुका पर्यटकांविना सूनसुना झाला होता. मात्र यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर प्रादुर्भाव कमी झाल्याने तसेच जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट कमी झाल्याने नुकतेच जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर गेल्या विकेंडला व यावेळीही पर्यटकांची पाऊले वर्षा पर्यटनासाठी वळली होती. अशात 10 जुलै रोजी शनिवारी तालुक्यातील पाली भूतीवली धरणामध्ये तीन अल्पवयीन मुले बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून साहिल हिरालाल त्रिभुके (वय 15 वर्षे), प्रीतम गौतम साहू (वय 12 वर्षे), मोहन साहू (वय 16) वर्षे अशी त्यांची नावे असून सर्व कुर्ला नवापाडा, नानीबाई चाळ येथील राहणारे आहेत.
पाली-भूतीवली धरणात बुडून तिघांचा मृत्यू एकाच चाळीतील असल्याने या 6 जणांनी शनिवारी वर्षा पर्यटनासाठी मुंबई बाहेर जाण्याचा बेत आखला होता. त्यानुसार शनिवारी सकाळी 7 च्या सुमारास त्यांनी कुर्ला रेल्वे स्थानक गाठले व लोकल ट्रेनने ते थेट कर्जत तालुक्यातील भिवपुरी स्थानक येथे 10 च्या सुमारास उतरले. त्यानंतर त्यांनी पाली भूतीवली धरण येथे आडमार्गाने प्रवेश करत धरणाचा शेवटचा भाग मौजमजा करण्यासाठी निवडला. तिथे एक-दोन तास मज्जा केल्यानंतर ते थोडे पुढे आले. तिथे चौघे पाण्यात खेळत असताना अचानक ते बुडायला लागले. तेव्हा त्यातील एकाला बाकीच्यांनी बाहेर काढले. मात्र बाकीचे तिघे बुडाले. कडक बंदोबस्तातही नजर चुकवून गेल्याने अपघाताला निमंत्रण -
घटना समजताच नेरळ पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचत त्यांनी स्थानिकांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तर कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख, पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल घेरडीकर, नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संजय बांगर आदी देखील उपस्थित होते. तर स्थानिकांच्या मदतीने शोध घेऊनही बुडालेले तिघे न सापडल्याने खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीमला पाचारण करण्यात आले. अपघातग्रस्तांच्या टीमचे सदस्य यांनी घटनास्थळी येताच परिस्थितीचा अंदाज घेत शोधकार्य सुरू केले. पाणबुड्या दर्श अभानी यांच्या सहकार्याने सर्व टीमने विशेष प्रयत्न करीत अवघ्या तासाभरात तीन मृतदेह शोधून काढले. तर नेरळ पोलिसांनी तिन्ही मुलांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी पुढे पाठवले आहेत.