पनवेल - राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कामोठे येथील सेक्टर 8 परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधली. या आरोग्य केंद्राचा वापर होत नसल्याने ते शोभेचे बाहुले बनले आहे. खुप दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने हे आरोग्य केंद्र धुळखात पडून आहे.
कामोठे सेक्टर १० मध्ये जिल्हा परिषदेचे छोटेसे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तिथे लसीकरण व प्रथमोपचार होत असतात. मात्र नागरिकांच्या वाढत्या मागणीनुसार सेक्टर ८ मध्ये देखील आरोग्य केंद्र असावे, अशी मागणी नागरिकांमधून होत होती. यासाठी गेल्या वर्षी आंदोलन देखील करण्यात आले होते. त्यानंतर १ मार्च २०१७ ला हे आरोग्य केंद्र सुरू करण्याचे आश्वासन सिडकोच्यावतीने देण्यात आले होते. मात्र त्यानंतर हा परिसर महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात आल्यानंतर हे आरोग्य केंद्र निव्वळ बुजगावणे ठरले आहे. कामोठे हा परिसर पनवेल महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर हे आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी कोणत्याच हालचाली दिसून येत नाहीत. या आरोग्य केंद्रात रुग्णांची रेलचेल असायला हवी होती त्याऐवजी या आरोग्य केंद्रात आता भटकी कुत्री फिरताना दिसून येत आहेत.
पनवेल महापालिका क्षेत्रात ३१ परिचारिका, १२ फार्मसिस्ट, आणि १२ लाख तंत्रज्ञ यांची भरती करणे गरजेचे आहे. मात्र या भरतीवर शासनाने स्थगिती आणली आहे. आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे हे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करणे शक्य नाही. मध्यंतरी भरतीची जाहिरातही काढण्यात आली होती, मात्र शासनाने स्थगिती दिल्याने ती रद्द करण्यात आली, त्यामुळे मनुष्यबळाअभावी हे आरोग्य केंद्र बंद असल्याची प्रतिक्रिया पालिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रमेश निकम यांनी दिली आहे.
एकीकडे राज्य सरकार, केंद्र सरकार आणि जिल्हा परिषद स्व उत्पन्नातून दरवर्षी सरकारी आरोग्य सेवेवर कोट्यावधी रुपयांचा चुराडा करते. मात्र, त्याचा लाभ गरजूंना मिळत नाही. वेळेवर रुग्णांना आरोग्य सुविधा मिळणार नसतील तर त्याचा उपयोग काय? असा सवाल उपस्थित झाला आहे. शहरापासून ते खेडेगावापर्यंत जागोजागी सरकारी आरोग्य यंत्रणेचे जाळे निर्माण करण्यात आलेले आहे. मात्र, हे जाळे कधीच विरले आहे. सर्वसामान्यांना आरोग्यसेवेसाठी खाजगी ठिकाणी उंबरे झिजविण्याचे वेळ आली आहे. अधिकारी, पुढाऱ्यांना नव्हे तर गोरगरिबांना आरोग्य सुविधा द्या, वर्षानुवर्षे पाठपुरावा करतोय, यंत्रणा निवड चेष्टा करते, आम्हाला कोणी वाली नाही का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अमोल शितोळे यांनी केला आहे.