रायगड- अयोध्येतील रामजन्मभूमी व बाबरी मशीद जमीन मालकीच्या वादाबाबत आज सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कळंबोली शहरात कोणत्याही प्रकारचा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यादृष्टीने कळंबोली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. ठिकठिकाणी पोलीस तैनात आहेत. पनवेलमध्ये गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची नजर आहे. संशयितांची कसून चौकशी करण्यात येते आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी बाळगण्यात येते आहे. रेल्वे स्थानकांवर देखील पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. कळंबोलीतील अतिसंवेदनशील ठिकाणी अधिक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सगळ्या देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर आज (9 नोव्हेंबर) सुप्रीम कोर्ट आपला ऐतिहासिक निकाल देणार आहे. याच पार्श्वभूमीवर देशभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. देशातील हा ऐतिहासिक निकाल असून सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अतिगर्दी, धार्मिक स्थळांवरचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी समाजघटक व त्यांच्या नेत्यांच्या बैठका घेऊन, त्यांना सूचना दिल्या आहेत. अनुचित प्रकार घडू नये, यादृष्टीने प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात येणार आहे. पोलिसांच्या सर्व शाखा बंदोबस्तामध्ये कार्यरत असतील. काही संवेदनशील ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, तिथेही जादा बंदोबस्त ठेवला आहे. निकालावर कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया उमटणार नाहीत, याचीही काळजी घेण्यात आली आहे, अशी माहिती कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिली आहे.