रायगड - शेकापचे नेते जयंत पाटील यांनी एका वृत्तपत्राच्या जिल्हा प्रतिनिधीला मारहाण केल्याची घटना घडली. हर्षद कशाळकर असे त्या पत्रकाराचे नाव आहे. तसेच अलिबाग येथे मतदान केंद्राबाहेर जयंत पाटील यांनी पोलिसांशीही हुज्जत घातली आहे.
हर्षद कशाळकर हे आपले वृत्तांकनाचे काम करून आपल्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले होते. त्यादरम्यान मतमोजणी केंद्रात आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन मतमोजणी केंद्रावर आले. त्यावेळी आमदार जयंत पाटील हे हर्षद कशाळकर यांना म्हणाले, की तुम्ही पत्रकार काहीही बातम्या छापता तर चांगल्या बातम्या पण छापा. आम्ही आता निवडून आलो असे संभाषण करीत थेट कशाळकर यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्या कानशिलात लगावली. तर आमदार पंडीत पाटील व अभिजित कडवे (बलमा) यांनीही कशाळकर यांना धक्काबुक्की केली.
हा सर्व प्रकार अलिबागचे डीवायएसपी दत्तात्रय निघोट यांच्यासमोर झाला. त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. त्यानंतर पत्रकारांनी याबाबत पोलिसांना विचारले असता मारहाण करणाऱ्या आमदार जयंत पाटील यांना संरक्षणासह दुसऱ्या रूममध्ये नेले. मात्र, त्यानंतर पत्रकारांनाच बाहेर जाण्यास पोलीस आग्रही भूमिका घेत होते. त्यानंतर पत्रकारांनी गोंगाट घातल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पत्रकारांची भेट घेतली. याबाबत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांडे लेखी तक्रार दाखल केली असून, अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, या घटनेनंतर पत्रकारांसहीत सामान्य जनतेने न्याय मागायचा तरी कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे.