रायगड - न्यायालयीन कोठडीत असलेल्या पतीला जेलमध्ये सामान तसेच आवश्यक सुविधा पुरविण्याकरीता मागितलेल्या चार हजार लाचेप्रकरणी अलिबाग जिल्हा कारागृहातील वर्ग २ च्या महिला जेलर यांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. सुवर्णा जनार्दन चोरगे (३३) रा. ड्रेफोडीलस बिल्डींग, गोंधळपाडा असे अटक केलेल्या जेलरचे नाव आहे. रायगड लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. गेल्या दोन महिन्यात चार लाचखोर अधिकाऱ्यांना लाच लुचपत विभागाने पकडले आहे.
जेलमध्ये सुविधा देण्यासाठी मागितली लाच -
तक्रारदार यांचे पती एका बिल्डरच्या हत्याप्रकरणात न्यायालयीन कोठडीत अलिबाग जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. जेलमध्ये पतीला आवश्यक असलेले सामान आणि सुविधा पुरविण्याकरीता तक्रारदार यांनी २१ जून रोजी जेलर सुवर्णा चोरगे यांना सांगितले. पतीला सुविधा पुरविण्यासाठी चोरगे यांनी तक्रारदार यांच्याकडे चार हजाराची लाच मागितली. तक्रारदार यांनी याबाबत अलिबाग येथील रायगड लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली.
जिमला जात असताना घेतली लाच -
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत पथकाने २२ जून रोजी सापळा रचला. आरोपी सुवर्णा चोरगे ह्या २२ जूनच्या सायंकाळी जिमला जात असताना तक्रारदार यांना अलिबाग शहरातील शेतकरी भवन येथे बोलावले. तक्रारदार यांनी चार हजाराची लाच देताना सापळा रचलेल्या पथकाने झडप घालून आरोपी चोरगे यांना रंगेहाथ पकडले. याआधी अलिबाग जिल्हा कारागृहातील मुख्य कारागृह अधिकारी पाटील यांना अर्णव गोस्वामी याला मोबाईल पुरविण्याबाबत निलंबित करण्यात आलेले आहे. त्यामुळे जेलमध्ये कैद्यांना पैसे देऊन सुविधा पुरविल्या जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
यांनी केली कारवाई -
लाचलुचपत विभागाच्या पोलीस उप अधीक्षक सुषमा सोनवणे, पोलीस हवालदार दीपक मोरे, महेश पाटील, विशाल शिर्के, पोलीस नाईक, जितेंद्र पाटील यांनी हा यशस्वी कारवाई केली.