रायगड - निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये नुकसान झाले असून, त्याचा पेण तालुक्यातील गणेशमूर्ती कारखानदारांनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या गणेशमूर्ती कारखानदारांना प्रशासनाने तत्काळ मदत देण्याचे आदेश उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी पेण येथे दिले आहेत. पेण तालुका गणेशमूर्तीसाठी प्रसिद्ध असून, येथील गणेशमूर्ती देशात व परदेशातही प्रसिद्ध आहे.
पेण तालुक्यात गणेशमूर्तींचे शेकडोंनी कारखाने असून यातील अनेक कारखान्यांचे कोरोना लॉकडाऊननंतर निसर्ग वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी स्वतः पेण येथे गणेशमूर्ती कारखान्यांना भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार रवीशेठ पाटील, शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार किशोर जैन, नरेश गावंड, प्रांत अधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार अरुणा जाधव, दीपश्री पोटफोडे, दर्शना जवके, अरुण भोईर यांच्यासह अधिकारीवर्ग उपस्थित होते. याप्रसंगी सुभाष देसाई यांनी गणेशमूर्ती कारखानदारांच्या व्यथा जाणून घेतल्या.
यावेळी पेणचे आमदार रविशेठ पाटील यांनी गणपती कारखानदारांना तातडीची मदत व नुकसान भरपाई तत्काळ देण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे शासनाकडून या कारखानदारांना देण्यात येणाऱ्या 50 हजार रुपयांच्या अनुदानाच्या रकमेतही वाढ करण्यात यावी, अशी मागणी केली. ज्या गणेशमूर्ती कारखानदारांचा विमा आहे, अशा कारखानदारांना विमा कंपनीने तातडीने मदत द्यावी अशी मागणी केली. यावेळी सुभाष देसाई यांनी प्रशासनाने तातडीने कार्यवाही पूर्ण करून गणपती कारखानदारांना मदत द्यावी, असे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिले.