रायगड - उरण तालुक्यामध्ये भटक्या श्वानांचा त्रास वाढला आहे. 3 दिवसांत 23 जणांना श्वानांनी चावा घेतल्याचे प्रकार घडले आहेत, तर जानेवारी महिन्यापासून 589 जणांना भटक्या श्वानांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे भटक्या श्वानांची दहशत खूप वाढली असून, नागरिकांना कोरोनापेक्षा श्वानांची जास्त भीती वाटू लागली आहे.
हेही वाचा - 'ईटीव्ही भारत' विशेष - कोकणातील पहिल्या बालस्नेही पोलीस केंद्राची अलिबागमध्ये स्थापना
श्वानांची दहशत कोरोनापेक्षा जास्त
तालुक्यातील करंजा, मोरा, फुंडे, बोकडविरा, जेएनपीटी वसाहत या विभागांमध्ये भटक्या श्वानांनी अनेकांना चावा घेतल्याचे प्रकार घडले आहेत. यामध्ये लहान मुलांना जास्त दुखापती झाल्या असल्याचे समोर आले आहे. महत्वाचे म्हणजे, रस्त्यावरून जाणाऱ्या कुणालाही हे श्वान विनाकारण चावा घेत असून, श्वानांनी अनेकांच्या पायांचे लचके तोडले आहेत, तर अनेक लहान मुलांच्या डोक्याला चावल्याने त्यांना गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या आहेत.
3 दिवसांमध्ये 23 जणांना श्वानांनी चावले
3 दिवसांमध्ये 23 जणांना श्वानांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, जानेवारी महिन्यापासून आजवर 589 जणांना श्वानांनी चावा घेतल्याची नोंद इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात 178, फेब्रुवारी महिन्यात 179, मार्च महिन्यामध्ये 202 आणि एप्रिल महिन्यातील 3 दिवसांमध्ये 23 जणांना श्वानांनी चावा घेतल्याच्या नोंदी झाल्या आहेत. यामुळे भटक्या श्वानांची दहशत ही कोरोना विषाणूपेक्षा जास्त झाली आहे. अशीच दहशत वाढू लागल्यास आणि अशाच प्रकारे श्वान नागरिकांवर हल्ला करू लागले तर मनुष्यांना हानी व्हायला वेळ लागणार नाही.
वेळीच उपाय करण्याची मागणी
तालुक्यामधील श्वानांची वाढती दहशत आणि हल्ल्यांची आकडेवारी पाहता यावर वेळीच उपाय होणे गरजेचे असून, याबाबत प्रशासनाने खबरदारी घेऊन तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी कोळी समाजाचे नेते मार्तंड नाखवा यांनी केली.
हेही वाचा - उत्खननात सापडली 350 वर्षांपूर्वीची सोन्याची बांगडी व निरांजन