रायगड - राज्यात कोरोनाने माणसे मरत आहेत, नवजात बालके मृत्युमुखी पडत आहेत, जेष्ठ नागरिक, महिला असुरक्षित आहेत आणि आता पक्षी मरत आहेत. या राज्यात न माणसे सुरक्षित न पक्षी, प्राणी सुरक्षित आहेत. फक्त महाविकास आघाडी सुरक्षित असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.
हेही वाचा - पोलादपूरमध्ये खोदकामात आढळल्या 15 पुरातन पाषाण मूर्ती
आमची पूर्ण सुरक्षा काढली तरी काही खंत नाही, पण काढलेली सुरक्षा जनतेला द्या, असा चिमटाही दरेकर यांनी राज्य सरकारला काढला. दरेकर आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी महाड येथे विसावा हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले.
राज्यात ना माणसे सुरक्षित ना पशुप्राणी
कोरोनामुळे आधीच राज्यात माणसे मरत आहेत. जेष्ठ नागरिक, महिलाही सुरक्षित नाहीत, आता राज्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव होऊन पोपट, कावळे, कोंबड्याही मृत्युमुखी पडत आहेत. मात्र, ठाकरे सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत असून योग्य त्या उपाययोजना करण्यात अकार्यक्षम ठरले आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार राज्यातील जनतेच्या विकास कामात फेल ठरत आहे, असा घणाघाती आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.
आमची सुरक्षा काढलीत, जनतेला तरी सुरक्षा द्या
राज्यातील वरिष्ठ नेत्यांची सुरक्षा काढल्यासंदर्भात दरकेर म्हणाले, आमची सुरक्षा काढली, आम्हाला खेद नाही. तीच सुरक्षा राज्यातील जनतेला पुरवावी. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला. एवढी मोठी घटना घडूनही ठाकरे सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. महाआघाडी सरकारचे व्यवस्थापन कुजकामी आहे, अशी चीड व्यक्त करून राज्यातील आरोग्य व्यवस्थेकडे पूर्णपणे काणाडोळा होत आहे. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा आरोग्य यंत्रणा प्रगत करण्यासाठी राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून जाब विचारणार आहे.
हेही वाचा - क्रिकेटच्या वादातून डोक्यात घातली बॅट, १३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू