रायगड - जिल्ह्यातील पेण तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गालगत सुरू असलेल्या आंबिवली येथील अवैध माती उत्खननप्रकरणी ईटीएस यंत्राद्वारे मोजणीला ३ महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र, एवढे होऊन देखील बेकायदेशीर माती उत्खनन करणाऱ्या माती माफियांवर अद्याप महसूल प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. या माती माफियांना साथ देणाऱ्या पेण महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा या माती माफियांना पाठिंबा आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे व सरपंच नेहा प्रशांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
मुंबई-गोवा महामार्गालगत आंबिवली गावाच्या हद्दीतील सर्वे नंबर १ या आदिवासी जागेत मागील ६ महिन्यांपासून उरण येथील एनजी भोईर हे अवैध उत्खनन करत आहेत. त्यांनी नाममात्र रॉयल्टी शासनाकडे भरून जून २०१९ पर्यंत हजारो ब्रास मातीचे अवैधपणे उत्खनन करून ही माती खाजगी भरावसाठी उरण तालुक्यात नेली होती. या बाबतचे पुरावे म्हणून फोटो व व्हिडीओ शूटिंग पेण प्रांताधिकारी कार्यालयात त्या त्या वेळी दिले आहेत असे हरीश बेकावडे यांनी सांगितले.
हेही वाचा - रायगडमध्ये तेजस एक्सप्रेसच्या धडकेने वाडा येथील तरुणाचा मृत्यू
याबाबत आपण वारंवार तक्रारी केल्यानंतर पेण प्रांताधिकारी यांनी या जागेची ईटीएस यंत्राद्वारे मोजणी करण्याची मागणी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात केली होती. त्यानुसार २ वेळा ईटीएस मोजणी करण्याचा प्रयत्न केला गेला. पण, दोन्ही वेळा मशीन बंद पडल्याने सदर मोजणी करता आली नाही. मात्र, १४ ऑगस्ट २०१९ ला आंबिवली येथील या क्षेत्राची इटीएस यंत्राद्वारे मोजणी करण्यात आली. या मोजणीमध्ये या सर्व्हे नं १ मधील ३२ हजार १९५ चौरस मीटर क्षेत्रामधून उत्खनन करत १ लाख ८२ हजार २१ ब्रास मातीचे उत्खनन केले असल्याचे निष्पन्न झाले. ताबाबतची माहिती मला पेण प्रांताधिकारी कार्यालयाकडून लेखी पत्राद्वारे कळविण्यात आली असल्याचेही हरीश बेकावडे व सरपंच नेहा प्रशांत पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - मुंबई-गोवा महामार्ग होणार सुसाट; जून 2020 पर्यंत रुंदीकरण होणार पूर्ण !
यापैकी स्वतःच्या खासगी माती भरावसाठी उरण येथील एनजी भोईर यांनी २ हजार २५४ चौरस मीटर क्षेत्रात उत्खनन करत १२ हजार ७४३ ब्रास मातीचे उत्खनन केले आहे. सदर माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी अलिबाग रायगड यांचे कार्यालयातील सर्व्हेअर श्रीकांत खराडे यांनी केलेल्या इटीएस मशीनद्वारे मोजणीत निष्पन्न झाले आहे. तर, मेजेएम म्हात्रे यांनी २९ हजार ९४२ चौरस मीटर क्षेत्रात १ लाख ६९ हजार २७८ ब्रास माती उत्खनन केले असल्याचे या अहवालात म्हटले आहे असे हरीश बेकावडे व आंबिवलीच्या सरपंच नेहा प्रशांत पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - कळंबोलीतील 'त्या' बॉम्ब प्रकरणी तपासाचे कौशल्य दाखवणाऱ्या तीन पथकांचा सन्मान
या ईटीएसद्वारे मोजणीला ३ महिने होऊन देखील संबंधित क्षेत्रात भरलेल्या रॉयल्टीपेक्षा कितीतरी पटीने अधिक माती उत्खनन केले असल्याचे दिसून येत आहे. मात्र, याबाबत पेण महसूल अधिकारी हे संबंधित माती उत्खनन करणाऱ्याकडून रॉयल्टी व दंड भरुन घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप हरीश बेकावडे यांनी यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
हेही वाचा - रायगड: महावितरणच्या 'त्या' लाचखोर कनिष्ठ अभियंत्याला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी