रायगड - मोदी सरकार देशाचे संविधान बदलणार असल्याचा खोटा प्रचार राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाचे नेते करत आहेत. मात्र, मी जोपर्यंत मोदींच्या मंत्रिमंडळात आहे, तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानाला हात लाऊ देणार नसल्याचे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले. तसेच केंद्रामध्ये मोदी सरकार हे चांगल्या प्रकारे काम करत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले भाजप आणि शिवसेनेबद्दल मुस्लिम आणि दलितांना खोटे सांगून त्यांच्या मनात द्वेष निर्माण करत आहेत, असा आरोपही आठवले यांनी केला.
श्रीवर्धन मतदार संघातील शिवसेना-भाजप-आरपीआय युतीचे उमेदवार डॉ. विनोद घोसाळकर यांच्या प्रचारार्थ म्हसळा येथे शुक्रवारी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - संगमनेर मतदारसंघ : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या गडाला खिंडार पाडण्यास विरोधक एकवटले
पुढे बोलताना ते म्हणाले, शिवसेना हा पक्ष मुस्लिम विरोधी नाही. राष्ट्रवादी मुस्लिमांच्या केसाला शिवसेना धक्काही लागून देणार नाही. तर माझ्या खात्याअंतर्गत येणारा विकास निधी मी घोसाळकर यांना देऊ इच्छितो. घोसाळकर हे एक चांगले मित्र व कार्यकर्ते आहेत. मतदार संघातील शेतकरी, मच्छिमार, बेरोजगार तरुण आणि महिला बचत गटांचे सर्व प्रश्न सोडवण्याची कुवत घोसाळकरांमद्धे आहे. घोसाळकर मंत्री व्हावेत, हीच माझी इच्छा आहे आणि संपूर्ण दलित समाजाचे मतदान त्यांना मिळेल, अशी आशा आठवले यांनी सभेत जाहीर केली.
हेही वाचा - 'प्रकाश मेहता भाजपचे सच्चे कार्यकर्ता, जिथे असतील तिथे पक्षाचंच काम करतील'
युतीचे उमेदवार डॉ.विनोद घोसाळकर यांनी मी आमदार नक्कीच होणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. तर तटकरे यांनी अनेक मंत्री पदे भूषवली असताना म्हसळा शहरातील पाणी पुरवठा योजनेचे 3 वेळा भूमिपूजन केले. मात्र, तरीदेखील ही योजना अपूर्ण का आहे आणि शहरातील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर का नाहीत, असा सवालही घोसाळकर यांनी उपस्थित केला. यावेळी हजारो कार्यकर्त्यांसोबत आठवले यांनी म्हसळा शहरात रोड शो करीत सभेच्या ठिकाणी उपस्थिती लावली.