रायगड - मासळी म्हटली की आपोआप जिभेला पाणी सुटते. त्यातच ताज्या माशांवर ताव मारण्याची मजा काही औरच असते. यासाठीच अलिबागच्या उच्च शिक्षित म्हात्रे बंधूनी मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडून मासेपालन करण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांना हवा तो मासा समोर पकडून देत असून 'आमच्या तळ्यातून, थेट तुमच्या तव्यात' ही संकल्पना त्यांनी राबवली आहे. त्यामुळे ताज्या म्हावऱ्यासाठी खवय्यांच्या उड्या पडू लागल्या आहेत.
अलिबाग तालुक्यातील शहाबाज या परिसरात गेली अनेक वर्षांपासून शेतात तळी निर्माण करून मत्स्यशेती केली जात आहे. शहाबाज धामणपाडा येथील शिक्षकी पेशात असलेले प्रवीण म्हात्रे हे सुद्धा मत्स्यशेतीकडे वळले आहेत. म्हात्रे यांची पियुष आणि सुशम या दोन मुलांनीही या क्षेत्रात उडी घेतली आहे. पियुष हा टेलिकम्युनिकेशन बी.टेक इंजिनियर. तर, सुशम हा मत्स्यविषयक शिक्षण रत्नागिरी येथे घेत आहे. पियुष तीन वर्षे नोकरी करून पुन्हा गावी आला आहे. वडिलांच्या पारंपरिक व्यवसायाकडे वळून या दोन्ही भावांनी अलिबाग-पिंपळभाट येथे जिवंत मासे विक्री व्यवसाय सुरू केला आहे. गावातील स्वतःच्या तळ्यातून जिवंत मासे आणून ते २० हजार लीटर पाण्याच्या टाक्यांमध्ये सोडले आहेत. विक्रीसाठी हे मासे काचेच्या टॅंक मध्ये ठेवले आहेत. त्यामुळे ग्राहकांना हवा तो जिवंत मासा टॅंक मधून दिला जातो.






या दुकानात तिलापी, बासा, रुपचंद, कोळंबी, खेकडे असे विविध प्रकारचे तळ्यातील मासे विक्रीस ठेवले आहे. अलिबागचा प्रसिद्ध असलेला जिताडा हा मासाही हंगाम सुरू झाल्यानंतर लवकरच विक्रीस ठेवला जाणार आहे. ९० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत येथे मासळीचे भाव आहेत. म्हात्रे बंधूनी सुरू केलेल्या या व्यवसायामुळे ग्राहकांना जिवंत ताजे चविष्ट मासे खाण्यास मिळू लागल्याने ग्राहकांची पावले दुकानाकडे वळली आहेत.