पनवेल - पनवेलमध्ये सकाळपासून पावसाच्या धुमाकुळीमुळे पनवेलकरांचे चांगलेच हाल झाले. रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढल्याने जागोजागी पाणी साचल्याने रस्त्यांवर अक्षरशः ओढा वाहत असल्याचे भासत आहे. मुसळधार पावसामुळे पनवेल पाण्याखाली गेले आहे. पहाटेपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे सुरुवातीच्या पावसानेच पनवेल महापालिकच्या नालेसफाईचा पर्दाफाश केला.
गेल्या महिनाभरापासून उष्णतेचा सामना करणाऱ्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. मुसळधार पाऊस पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात शेतीसाठी चांगला असला तरी पावसामुळे पाणी साचले होते. नेहमीप्रमाणे पनवेल शहरात पायोनियर सोसायटी, तालुका पोलीस ठाणे या भागात तर, कळंबोलीतील मुख्य रस्त्यावर श्री अपार्टमेंट, करावली चौक या भागातही पाणी साचले आहे. कळंबोलीतील बैठ्या घरांत काही ठिकाणी दारापर्यंत पाणी साचले आहे. तसेच गावदेवी पाड्यावरील बैठ्या घरात देखील पाणी शिरल्याने इथल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. काहींच्या घरात तर किचनपर्यंत पाणी शिरल्याने हलवाहलवी करावी लागली. घरात शिरलेले पाणी बाहेर काढण्यात ही सर्व मंडळी व्यस्त होती. त्यामुळे सकाळी कामावर जाण्याचे वेळापत्रकही कोलमडले.
ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे महापालिकेने पावसाळ्याची अजिबात पूर्वतयारी केली नसल्याचे उघड झाले. अनेक ठिकाणी गुडघाभर साचलेल्या पाण्याने नागरिकांचे आणि वाहनचालकांचे बेसुमार हाल झाले. अनेक ठिकाणी महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाला मदतीसाठी पाचारण केले आहे. पनवेल बस डेपोच्या बाजूलाच आलेल्या ओरियन मॉलकॅब्या समोरील परिसरात तळ साचले आहे. त्यामुळे मॉलमधून बाहेर पडणारे आणि मॉलमध्ये खरेदीसाठी जाण्यासाठी परिसरात पाणी तुंबल्याने गुडघाभर पाण्यातून वाट काढताना प्रवाशांची चांगलीच दमछाक झाली होती.
खारघर, कळंबोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. कामोठे येथील नौपाडा गावात १५ ते २० घरांत पाणी शिरल्याने येथील गावकऱ्यांची धावपळ झाली. खारघरमधील फरशिपडा या ठिकाणीदेखील घरात पाणी साचले. पनवेल शहरातही काही सखल भागात पाणी साचल्याचे पाहावयास मिळाले. मार्केटमध्येही पाणी साचल्याने शुकशुकाट दिसत आहे. तर काही दुकानदारांनी आपले दुकान बंदच ठेवणे पसंद केले आहे. त्यामुळे पनवेल परिसर, कळंबोली, कामोठे सिडको वसाहतीत नाले सफाई फोल ठरली आहे.