रायगड - जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. हवामान विभागाने पुढील काही तास जिल्ह्यातील विविध भागात आणखी धुवांधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून यंत्रणेना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जून महिन्यात कमी पाऊस झाला. यानंतर जुलै महिन्याला सुरुवात होताच पावसाचे पुन्हा आगमन झाले आहे. पाऊस सुरू झाल्याने आता भात लावणी कामालाही वेग येणार आहे. सखल भागात पाणी असल्याने काही शेतकऱ्यांनी भात लावणी सुरू केली होती. तर काहींच्या शेतात पाणी नसल्याने अजून ही लावणी सुरू झाली नव्हती. मात्र, पुन्हा सुरू झालेल्या या पावसामुळे आता शेतकरी सुखावला आहे.
जिल्ह्यात पुढील काही तास मुसळधार पाऊस असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच 6 जुलैपर्यंतही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. तर आज (शुक्रवारी) सुरू झालेल्या या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.