रायगड - जिल्ह्यात 4 ते 6 तारखेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसार जिल्ह्यात मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. तर आज समुद्रात 4 ते 5 मीटरच्या लाटा उसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नदीकिनारी आणि समुद्रकिनारी गावांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून अनेक भागात पाणी साचले आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे शेतातही पाणी साचले असून भात लावणी कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात सहा तारखेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
जिल्ह्यात आज एकूण 975.50 मिमी पाऊस पडला असून सरासरी 60.98 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात तळा तालुक्यात सर्वाधिक 141. मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात अलिबाग 45 मिमी पेण 40 मिमी, मुरुड 69 मिमी, पनवेल 92.20 मिमी, उरण 73 मिमी, कर्जत 14 मिमी, खालापूर 34 मिमी, माणगाव 60 मिमी, रोहा 83.30 मिमी, सुधागड 65 मिमी, महाड 12 मिमी, पोलादपूर 48 मिमी, म्हसळा 65 मिमी, श्रीवर्धन 88 मिमी, माथेरान 45.60 मिमी पावसाची नोंद झाली आहे.