रायगड - जिल्ह्यात चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. अनेक भागात पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर अजूनही कायम आहे. अतिवृष्टीची शक्यता असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नदी व समुद्र किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाला सज्ज राहण्यास आदेश दिले आहेत. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात पावसाचा आज चौथा दिवस आहे. सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने न केलेल्या कामाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. पावसामुळे जिल्ह्यातील नद्या तुडुंब भरून वाहायला लागल्या आहेत. त्यांनी अजून धोक्याची पातळी ओलांडली नाही मात्र, तेथील तरीही किनारी गावांना सतर्क राहण्याची सूचना प्रशासनाने केली आहे. पावसामुळे अनेक भागात झाडे कोसळून पडली आहेत.
या पावसामुळे खोपोली-कर्जत रेल्वेमार्गावर झाड कोसळल्याने काही काळ रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वेरुळावरील झाड बाजूला काढल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. चार दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. आता पाऊस नकोसा वाटत असला तरी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद उमटला आहे. आणि त्यामुळेच शेतकऱ्यांनी शेतीची कामेही सुरू केली आहेत.