रायगड - जिल्ह्यात महाड, पोलादपूर, माणगाव तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. सावित्री आणि गांधारी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड शहरात सोमवारी रात्री पुराचे पाणी शिरले होते. तसेच बाजारपेठेत देखील कंबरभर पाणी होते.
जिल्ह्यात सोमवारपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी दक्षिण भागात पाऊस सुरू होता. महाडमध्ये दुपारी पाऊस कमी झाला होता. मात्र, सायंकाळपासून पाऊस पुन्हा सुरू झाल्याने पूरपरिस्थिती कायम होती. चवदार तळेही ओसंडून वाहत होते. त्यामुळे महाड शहरात पाणी शिरले होते. मंगळवारी सकाळी देखील पूरपरिस्थिती कायम आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी लष्कारासह एनडीआरएफची पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.