रायगड - अर्णब गोस्वामी यांना चुकीच्या पद्धतीने न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. रायगड पोलिसांनी न्यायाधीश आर. मल्लशेट्टी यांच्या न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या या याचिकेवर शनिवारी (7 नोव्हेबर) सुनावणी होणार आहे. या सुनावणीबाबत आरोपींना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.
रायगड पोलिसांच्या पुनर्विचार याचिकेवर 7 नोव्हेंबरला सुनावणी
हेही वाचा -मुंबई उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामींचा जामीन अर्ज फेटाळला
रायगड पोलिसांनी 4 नोव्हेबरला अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांना अटक केली होती. सत्र न्यायालयात तिघांना हजर केले असता, न्यायाधीश सुनयना पिगळे यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याबाबत रायगड पोलिसांनी न्यायालयीन कोठडीबाबत पुनर्विचार याचिका पहिले तथर्थ न्यायाधीश आर मल्लशेट्टी यांच्या न्यायालयात दाखल केली आहे. जिल्हा सरकारी वकील भूषण साळवी यांच्यामार्फत ही याचिका पोलिसांनी दाखल केली आहे.
सदर याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली आहे. या याचिकेबाबत आरोपींना नोटीस देण्यात आल्या असून, शनिवारी 7 नोव्हेबरला सुनावणी होणार आहे. या सुनावणी दरम्यान अर्णब गोस्वामी यांना पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी कायम राहणार हे कळणार आहे.
अर्णब गोस्वामींचा जामीन अर्ज घेतला मागे
अर्णब गोस्वामी यांच्या जामिनाचा अर्ज अॅड गौरव पारकर यांनी 4 नोव्हेबर रोजी दाखल केला होता. या अर्जावर सुनावणीची कोणतीही पुढील तारीख नसल्यामुळे आणि सरकारी वकील, पोलीस अधिकारी यांनी कोणतेही म्हणणे दिले नाही. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांचा जामीन अर्ज अॅड गौरव पारकर यांनी मागे घेतला आहे. तर फिरोज शेख व नितेश सरडा यांचे जामीन अर्ज अॅड. सुशील पाटील, अॅड निहा राऊत यांनी मागे घेतले नाहीत.