रायगड- कर्जतहून पुण्याकडे गहू घेऊन जाणारी मालगाडी आज पहाटे जांबरुख या ठिकाणी रेल्वे रुळावरून घसरली होती. यात या गाडीचे तीन इंजिन व एक डबा घसरला. यामुळे मध्य रेल्वे सेवा कोलमडली होती. अपघात झाला असला तरी या मालगाडीतील गहू रेल्वे प्रशासनाने स्थानिक नागरिकांना मोफत घेऊन जाण्यासाठी सांगितला. त्यामुळे मालगाडीचा झालेला हा अपघात स्थानिकांसाठी फायद्याचा ठरला आहे.
पहाटे कर्जत येथून शासकीय गहू मालगाडीत भरून मालगाडी पुण्याकडे निघाली होती. दरम्यान १०९/५० कि.मी अंतरावर जांबरुख याठिकाणी मालगाडी आल्यानंतर तिचे तीन इंजिन व एक गहूने भरलेला डबा रेल्वेरुळावरून घसरला. रेल्वे रुळावरून घसरल्याने डब्यातील गव्हाची पोती रुळावर पडली होती. या अपघातामुळे ही पोती परत भरून घेऊन जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा खर्च व वेळ जाणार होता. तसेच पावसाचे दिवस असल्याने गहू भिजून खराब होण्याची शक्यता होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जांबरुख सह परिसरातील आदिवासी व स्थानिक नागरिकांना गहू मोफत घेऊन जाण्याची परवानगी दिली. त्यामुळे गव्हाची पोती घेऊन जाण्यासाठी स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या अपघातामुळे मध्य रेल्वे सेवा कोलमडल्याचे पाहायला मिळाले.
हा अपघात शासनाला नुकसानदायक ठरला असला तरी, तो स्थानिक ग्रामस्थांना फायद्याचा ठरला आहे. यामुळे चार पाच महिन्यांसाठी गहू विकत आणण्याचा नागरिकांचा खर्च वाचणार आहे.