रायगड - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी काल (10 जून) रायगड जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील भूमीपुत्रांनी मानवी साखळी आंदोलन केले. आगरी सेना प्रमुख राजारामजी साळवी यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हाप्रमुख सचिन एकनाथ मते यांच्या नेतृत्वाखाली खालापूर तहसीलदार कार्यालयात मानवी साखळी उपोषण पार पडले. नवी मुंबई येथील विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशा मागणीचे पत्रही खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांना आगरी सेनेच्या वतीने देण्यात आले. दरम्यान, यावेळी कोरोना नियमांचे पालन करून तसेच कुठेही कायदा सुव्यवस्था यांचा भंग न करता शांततेत हे आंदोलन पार पडले.
'नवी मुंबईच्या उभारणीत दि. बा. पाटलांचे कार्य मोलाचे'
'माजी आमदार व माजी खासदार रायगड जिल्ह्याचे भूमिपुत्र, दिवंगत दि. बा. पाटील यांचे नवी मुंबई उभारण्यात आणि प्रकल्प ग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यात मोठे योगदान आहे. कोकणातील शिक्षण प्रसारात दि. बा. पाटील यांचे बहुमोल योगदान आहे. नवी मुंबई, रायगड जिल्ह्याच्या अनेक भागात त्यांनी क्रांतिकारी कार्य केले आहे. दि. बा. पाटील यांचे सामाजिक योगदान अनमोल आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव दिले पाहिजे. ही स्थानिक भूमीपुत्रांची मागणी योग्य आहे. त्या मागणीला आगरी सेनेने जाहीर पाठिंबा दिल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे', अशी मागणी आगरी सेनेने केली.
दरम्यान, या मागणीची निवेदनही खालापूरचे तहसिलदार इरेश चप्पलवार यांना आगरी सेना जिल्हाध्यक्ष सचिन मते यांच्या वतीने देण्यात आले.
हेही वाचा - विना परवाना श्वानांच्या शर्यती आयोजित केल्याने दोघांवर गुन्हा दाखल