रायगड - राज्याचे माजी ग्रामविकास व गृहराज्यमंत्री प्रभाकर मोरे यांचे आज मुंबईत हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. सकाळी 10.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ते 75 वर्षांचे होते. प्रभाकर मोरे यांनी 15 वर्षे विधानसभा सदस्य व पाच वर्षे मंत्रिपद भूषविले आहे. तसेच रायगडचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले होते. महाड विधानसभा मतदारसंघातून ते तीनवेळा शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले होते.
मोरे यांचे महाड तालुक्यातील ताम्हणी हे गाव. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी साडेदहा वाजता त्याची प्राणज्योत मालवली. मुंबई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रभाकर मोरे यांचा महाडच्या विकासात सिंहाचा वाटा आहे. प्रभाकर मोरे यांनी मंत्री पदाच्या काळात व विधानसभा सदस्य असताना महाडमधील कोथुर्डे धरण, खैरे धरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, पंचतारांकित औद्योगिक वसाहत ही महत्त्वपूर्ण कामे केली. मोरे यांनी केलेल्या विकासकामांचा फायदा आज महाडकरांना मिळत आहे. प्रभाकर मोरे यांनी पंधरा वर्षे विधानसभा सदस्य पद, तर पाच वर्ष मंत्रिपद भूषविले आहे.