रायगड - जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. महाडमधील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरस्थिती होत असताना महाड नगरपालिकेने खबरदारी घेतली आहे. नदीकिनारी असलेल्या 100 जणांना नगरपालिकेने सुरक्षितस्थळी हलविले आहे. नागरिकांनी पूरस्थितीमध्ये बाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यधिकारी जीवन पाटील यांनी महाडकरांना केले आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सगळीकडे पावसाने हाहाकार उडविला आहे. महाड शहरात मंगळवारपासून पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी शहरात वाढण्यास सुरुवात झाली आहे. महाड बाजारपेठ ही पूर्णतः पुराच्या पाण्यात आहे. तेथील पाणी हळूहळू वाढू लागले आहे.
नगरपालिकेने नदीकिनारी राहणाऱ्या 100 जणांना शाळेत हलविले आहे. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था नगरपालिकेकडून करण्यात आलेली आहे. महाड नगरपालिकेच्या दोन तर इतर संस्थेच्या दोन बोटी पुरग्रस्त नागरिकांना हलविण्यासाठी तयार ठेवण्यात आल्या आहेत. पुराच्या पाण्यात कोणी बाहेर पडू नये, अशी सूचना सायरन तसेच दवंडी देऊन करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षतेसाठी नगरपालिकने खबरदारी घेतली असल्याचे मुख्यधिकारी जीवन पाटील यांनी सांगितले आहे.