रायगड - जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, महाडमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढला असून सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पुन्हा महाडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.
महाड शहरात दस्तुरी नाका, क्रांती स्तंभ, सुकट गल्ली परिसरात पुराचे पाणी घुसले आहे. पुराच्या अनुषंगाने महाड शहरात इंडियन कोस्ट गार्ड पथक तसेच बचावासाठी बोटी तयार ठेवण्यात आल्या आहेत.
महाड शहरात दोन दिवसांपासून पावसाने थैमान घातले असून पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर सकाळी महाड शहरातील पूर ओसरला होता. पूर ओसरल्याने नागरिकांनी घरात शिरलेले पाणी काढून स्वच्छताही सुरू केली होती. महाड नगरपालिकेनेही शहरात पुरामुळे रस्त्यावर साचलेला कचरा काढण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे शहरातील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली होती. दुपारनंतर मात्र पुन्हा पावसाने सुरुवात केल्याने सावित्री नदीने पुन्हा आपली धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे शहरात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे.
पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्थानिक यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.