रायगड - जखमी अवस्थेत असलेल्या फ्लेमिंगोला औषधोपचार केल्यानंतर उरणमधील पांणवठ्याजवळ सोडण्यात आले आहे. उरण वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या फ्लेमिंगोला नवे जीवदान दिले. त्यामुळे फ्लेमिंगो हा आपल्या सवंगड्यात मिसळला आहे.
फ्लेमिंगो झाला होता जखमी
उरण शहरालगत असलेल्या शेवा पोलीस ठाण्याजवळच्या पाणवठ्यामध्ये एक फ्लेमिंगो निपचित पडलेला आढळून आला होता. या जखमी फ्लेमिंगोची माहिती वनखात्याला देऊन त्याच्यावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करून त्याच्या जखमेवर टाके घालण्यात आले. यानंतर, या जखमी फ्लेमिंगोला वनखात्याच्या सल्ल्याने दोन दिवस निरिक्षणाखाली ठेवण्यात आले होते.
फ्लेमिंगोला उपचारानंतर सोडले थव्यासोबत
दरम्यान, आज दुपारी या फ्लेमिंगोला वन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत डोंगरी गावाच्या मागील बाजूस पाणवठ्यामध्ये असलेल्या फ्लेमिंगोच्या थव्याजवळ सोडण्यात आले. यावेळी, वन कर्मचारी आणि पक्षीमित्रांनी सुमारे एक ते दीड तास या जखमी फ्लेमिंगोच्या हालचालींचे निरीक्षण केले.
हेही वाचा - बहिणीच्या लग्नासाठी फटाके आणायला गेलेल्या भावाचा अपघातात मृत्यू