रायगड - जिल्ह्यात पनवेल महानगरपालिका आणि उरण तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळे असून उर्वरित तालुक्यांना कोरोनाची लागण झालेली नव्हती. मात्र, वरळी येथून श्रीवर्धन तालुक्यात आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यक्तीवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचीही तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी दिली. जिल्ह्यात चालत, समुद्रामार्गे आलेल्या नागरिकांमुळे आता कोरोना पसरण्याची भीती नागरिकांमध्ये पसरू लागली आहे. पनवेल येथे अजून चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील संख्या ३७वर गेली आहे.
वरळी येथून हा व्यक्ती श्रीवर्धन तालुक्यातील भोस्तेगाव येथे आपल्या वाहनाने आला होता. त्यानंतर या व्यक्तीने स्वतः हून खासगी दवाखान्यात जाऊन आपली तपासणी करण्यास सांगितले होते. मात्र, खासगी डॉक्टरांनी त्यांना शासकीय रुग्णालयात जाण्यास सांगितले. हा व्यक्ती श्रीवर्धन शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी गेले असता त्यांना तुम्ही पनवेल येथे जाऊन तपासणी करून घ्या असे सांगितले. या व्यक्तीने कामोठे एमजीएम येथे जाऊन तपासणी करून 12 एप्रिलला त्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी लॅब मध्ये पाठविले होते. या व्यक्तीचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्याची माहिती घेऊन त्यांनाही क्वारंटाइन केले जाणार आहे. हा व्यक्ती भोस्ते गावातील असल्याने गाव पूर्णपणे सील केले आहे. आज या व्यक्तीसोबत पनवेलच्या चार जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले असल्याने आता पनवेल महानगरपालिका परिसरासह जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 37वर गेली आहे.