पनवेल - रोडपालीमधील भूमिका रेसिडेन्सी या 14 मजली इमारतीला आग लागण्याची घटना घडली आहे. चौदाव्या मजल्यावर ही आग लागल्याने संपूर्ण भाग आगीच्या भक्षस्थानी सापडला. या रेसिडेन्सी समोरील सोसायटीत राहणाऱ्या एका दक्ष नागरिकाच्या प्रसंगावधनामुळे या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पनवेलच्या रोडपाली येथील सेक्टर 20 मध्ये ही 14 मजली इमारत आहे. याच इमारतीतील चौदाव्या मजल्यावर असलेल्या 1401 नंबर असलेल्या घरात ही आग लागली. या घरातील इतर सदस्य कामावर गेले होते. परंतु एक वयस्क आई यावेळी घरात होत्या. घराच्या बाहेर पडण्यासाठी खालच्या मजल्यावर येऊन बाहेर पडणे हा एकमेव मार्ग होता. हाच मार्ग आगीने पूर्णपणे आपल्या कवेत घेतला होता. त्यामुळे दरवाजाही लॉक झाला होता.
आगीचा भडका एवढा प्रचंड होता की, आग आणि धुरामुळे संपूर्ण घरच वेढले गेले होते. नशीब बलवत्तर म्हणून याच भूमिका रेसिडेन्सीच्या बरोबर असलेल्या द स्प्रिंग सोसायटीत असलेल्या राहुल जाधव यांनी प्रसंगावधान दाखवत लागलीच त्याच इमारतीत राहत असलेले पनवेल महापालिकेचे सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर खामकर यांना फोनवर माहिती दिली.
त्यानंतर लागलीच खामकर यांनी यंत्रणा हालवत अग्निशमन यंत्रणा ताबडतोब घटनास्थळी दाखल झाली. राहुल यांनी भूमिका रेसिडेन्सीकडे धाव घेत सर्व रहिवासीयांना अलर्ट केलं आणि सोसायटीतील फायर फायटिंग सेवा सुरू केली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी काही मिनिटाच ही आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत चौदा मजल्यावर असलेल्या घराची राखरांगोळी झाली.