रायगड - मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावर बुधवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मच्छीमारांच्या चार बोटींसह मासळी जळून खाक झाली. या आगीत मच्छीमारांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
बुधवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमाराला समुद्र किनारी असलेल्या बोटींना आग लागली. या घटनेत 3 मोठ्या आणि 1 लहान अशा एकूण चार बोटी आगीत जळून खाक झाल्या. या बोटींमध्ये मासेमारीसाठी लागणाऱ्या लाखो रुपये किमतीच्या जाळ्याही जळून गेल्या. मच्छिमारांनी पकडलेली २० लाख रुपयांची मासळीदेखील या आगीत जळून खाक झाली.
हेही वाचा - मुंबईच्या तरुणाने तब्बल 46 हजार 80 प्लास्टिक मण्यांपासून बनवली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा
कोळी बांधवांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने ते शक्य झाले नाही. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मुरुड पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.