रायगड - सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथे अष्टविनायक पेट्रोकेमिकल कंपनीतील डांबर प्लांटला सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग कशाने लागली याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. खोपोली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कंपनीत पेट्रोकेमिकल असल्याने स्फोट होण्याची शक्यता असल्यामुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांना बाहेर काढून परिसर निर्मनुष्य करण्यात आला. तसेच परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
आगीचे वृत्त कळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग भडकल्यामुळे अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. या आगीत जीवितहानी आणि नुकसानीबाबतची माहिती कळलेली नाही. या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.