रायगड - महाड येथील तारीक गार्डन इमारत दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी फारूक काझी अद्याप फरार आहे. मात्र, अटकपूर्व जामीनासाठी त्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आज (दि. 31 ऑगस्ट) त्याने अटकपूर्व जामीनासाठी माणगाव सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर 3 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.
24 ऑगस्टला संध्याकाळी झालेल्या तारीक गार्डन या इमारत दुर्घटनेत 16 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणी बिल्डर फारूक काझीसह 6 जणांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आतापर्यंत या इमारतीचा आरसीसी सल्लागार बाहुबली धामणे व फारूकचा सहकारी युनुस शेख या दोघांना पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणी वास्तुविशारद गौरव शहा, तत्कालीन मुख्याधिकारी दीपक जिंदाड तसेच अभियंता शशिकांत दिघे यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस तपासात पुढे आलेल्या माहितीवरून या गुन्ह्यामध्ये फसवणूक आणि खोटी कागदपत्रे वापरल्याची कलमे वाढवण्यात आली आहेत. फारूकच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणीसाठी न्यायालयाने 3 सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे.
हेही वाचा - महाड इमारत दुर्घटना: बिल्डर फारूक काझीचा साथीदार युनूस शेखला अटक