रायगड - अलिबाग तालुक्यातील उसर येथे येऊ घातलेल्या गेलच्या पॉलिमर प्रकल्पाची पर्यावरण विषयक जनसुनावणी आज पार पडली. या सुनावणीत स्थानिकांकडून पर्यावरण विषयक फारशा हरकती न आल्याने प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला. स्थानिकांकडून यावेळी प्रकल्पाला विरोध नाही पण नोकरीत स्थानिकांना प्राधान्य द्या, अशी मागणी करण्यात आली. या जनसूनवणीबाबत प्रसार माध्यमांना कोणतीच कल्पना देण्यात आली नव्हती.
अलिबाग तालुक्यातील उसर येथे गेल कंपनीचा प्रकल्प कार्यान्वयीत होता. मात्र, गॅस पुरवठा होत नसल्याने हा प्रकल्प गेल्या काही वर्षापासून बंद ठेवण्यात आला. आता या बंद पडलेल्या प्रकल्पाच्या जागेवर पॉलिमर निर्मितीचा महाकाय प्रकल्प येणार आहे. यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. सात हजार कोटी रुपयांच्या या प्रस्तावित प्रकल्पासाठी शुक्रवारी सहाणगोठी बायपास रस्त्यावरील मंगल कार्यालयात जनसुनावणी पार पडली. यावेळी अलिबागच्या प्रांताधिकारी शारदा पोवार आणि महाराष्ट्र प्रदुषण नियत्रंण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे एस साळुंखे उपस्थित होते.
प्रोपेन डिहायड्रेशन आणि पॉलीप्रोपेन युनीटची या ठिाकाणी पुढील चार वर्षात उभारणी केली जाणार आहे. यातून दरवर्षी जवळपास १ हजार टन पॉलिमर निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पाबाबत आज जनसुनावणी घेण्यात आली. यात प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चा होणे अभिप्रेत होते. मात्र, स्थानिकांकडून प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या द्याव्यात, यापुर्वी संपादीत झालेल्या जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा, कंपनीचा सिएसआर फंड जिल्ह्यातच वापरला जावा यासारखे मुद्दे उपस्थित करण्यात आले. प्रकल्पग्रस्तांच्या वतीने अश्विनी कंटक आणि अनंत गोंधळी यांनी बाजू मांडली. मात्र, कंपनी प्रशासनाच्या वतीने याबाबत कुठलेही ठोस आश्वासन यावेळी देण्यात आले नाही. अखेर पर्यावरणाच्या मुद्द्यांवर चर्चा न होताच जनसुनावणी पार पडली.
जनसुनावणीचे अध्यक्षपद भुषविणाऱ्या प्रांताधिकारी शारदा पोवार यांनी स्थानिकांच्या मागण्या रास्त असून त्याबाबात शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. कंपनीच्या वरिष्ठ प्रशासनाला या मागण्याबाबत अवगत केले जाईल जाईल. प्रकल्पग्रस्तांनी एक कमिटी गठन करून कंपनी प्रशासनाशी वाटाघाटी कराव्यात असे त्यांनी सुचित केले. प्रकल्पाला आमचा विरोध नाही, पण स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्या असा सूर उपस्थितांनी शेवटी लावला. प्रकल्पासंदर्भात पर्यावरण विषयक फारशा हरकती न आल्याने जनसुनावणी संपल्याचे प्रांताधिकाऱ्यांनी जाहिर केले.