पनवेल - राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पनवेलमधील तळोजा सीईटीपी मंडळ आणि मुंबई वेस्ट व्यवस्थापन कंपनीला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी तळोजामधील प्रदूषणासाठी चर्चेत राहिलेल्या घोट नदीचीदेखील पाहणी केली. यावेळी मात्र पर्यावरण मंत्र्याच्या अचानक येण्याने अधिकारी वर्गाची चांगलीच धांदल उडाली.
तळोजा एमआयडीसीमधील कारखान्यांतील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा सीईटीपी प्रकल्प हा आतापर्यंत वादाचा विषय ठरला आहे. जुनाट झालेल्या या प्रकल्पात रासायनिक पद्धतीने सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे जवळच असलेल्या कासाडी नदी आणि परिसरात प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे या परिसरात प्रदूषण होत आहे. ही बाब लक्षात येताच दोनदा सीईटीपी मंडळ बरखास्त करण्यात आले होते. सध्या या सीईटीपी मंडळाचे अद्यावतीकरण करण्याचे काम सुरू आहे. हा प्रकल्प देखरेखीसाठी एमआयडीसीकडे वर्ग करण्यात आला आहे. त्याबरोबरच येथील प्रशासन सांभाळण्यासाठी याठिकाणी एक प्रशासकही नेमण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी तळोजा येथील सीईटीपी मंडळाला अचानक भेट दिली. हा प्रकल्प एमआयडीसीकडे हस्तांतरित केल्यानंतर यामध्ये नेमका काय बदल झाला? औद्योगिक सांडपाण्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया व्यवस्थित केली जाते का? या सर्व गोष्टींचा त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा घेतला. याबरोबरच त्यांनी यावेळी येथील पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी घेतले.