रायगड- कोरोनामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू असून प्रवासी वाहतूक बंद आहे. अशा वेळेस रुग्णालयात प्रसूती झालेल्या बाळास तातडीची वैद्यकीय सेवेची गरज भासली. त्यामुळे डॉक्टरांनीच आपल्या मोटारसायकलवर बाळाला रुग्णालय नेले. डॉक्टरांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे परिसरात डाॅक्टरचे कौतुक केले जात आहे.
हेही वाचा- ईटीव्ही भारत विशेष : राज्यातील आंबा आणि मच्छिमारी व्यवसाय संकटात
अलिबाग शहरातील श्रीबाग येथील डॉ. वाझे नर्सिंग होममध्ये अलिबागमधील 32 वर्षीय महिलेची प्रसूती झाली. आधीच्या प्रसूती काळातही तिचे पहिले बाळ दगावले होते. तर यावेळच्या प्रसूतीकाळात बाळाचे हृदयाचे ठोके कमी होत असल्याने तातडीने डॉ. वाझे यांनी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली. यावेळी बालरोग तज्ञ डॉ. राजेंद्र चांदोरकर यांनाही बाळाच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाचारण केले.
डॉ. वाझे यांनी शस्त्रक्रिया करून महिलेची प्रसूती केली. प्रसूतीनंतर बाळ रडलेही पण थोड्यावेळात काळे निळे पडले. बाळाला श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला. त्यावेळी डॉ. चांदोरकर यांनी बाळास तपासून त्वरित एनआयसीयूमध्ये दाखल करण्यास सांगितले. मात्र, कोरोनामुळे संचारबंदी लागू असल्याने रुग्णालयाजवळ एकही रिक्षा उपलब्ध नव्हता. त्यामुळे डॉ. चांदोरकर यांनी बाळाला आपल्या दुचाकीवर रुग्णालयात नेले.
डॉ. चांदोरकरांनी त्वरित बाळाच्या मावशीला सोबत घेऊन बाळाला मोटारसायकलवर आनंदी रुग्णालयात आणले. त्यानंतर बाळाला एनआयसीयूमध्ये दाखल करून योग्य ते उपचार केले. बाळाला काही काळ ऑक्सिजन लावले असून आता बाळ बरे झाले असून आईच्या कुशीत विसावले आहे.
डॉ. चंद्रकांत वाझे आणि डॉ. राजेंद्र चांदोरकर यांच्या तत्परतेमुळे आज बाळ सुखरुप असून बाळाच्या पालकांनीही त्याच्यात देव दिसला असल्याचे म्हटले आहे. दोन्ही डॉक्टरांच्या या सेवाभावी कार्यामुळे समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.